वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर लादलेले निलंबन मागे घेतले आहे, यामुळे या खेळाभोवती अनेक महिन्यांपासून असलेली अनिश्चितता संपली आहे आणि अम्मान येथे होणाऱ्या आगामी आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड चाचण्यांसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
21 डिसेंबर, 2023 रोजी निवडून आलेल्या नवीन समितीकडून झालेल्या प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक अखंडतेतील त्रुटींमुळे 24 डिसेंबर, 2023 रोजी मंत्रालयाने महासंघाला निलंबित केले होते. त्यांनी महासंघाचे कामकाज चालविण्यासाठी एक अस्थायी मंडळ तयार करण्यास भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सांगितले होते.
संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील महासंघाने महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंडाच्या नंदिनीनगरमध्ये 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती आणि माजी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप असल्याने हे ठिकाण निवडल्यावरून सरकार नाराज झाले होते.
मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महासंघाने अनुपालनात्मक उपाययोजना केल्या आहेत, म्हणून खेळ आणि खेळाडूंच्या मोठ्या हिताचा विचार करून निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघ अजूनही ब्रिजभूषण यांच्या निवासस्थानातून कार्यरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, ज्याने मंत्रालयाला एक पडताळणी समिती स्थापन करण्यास प्रवृत्त केले होते. सदर समितीने प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली होती. त्यात महासंघाने त्याचे कार्यालय नवी दिल्लीतील पूर्व विनोदनगर येथे हलवले असल्याचे दिसून आले होते.









