वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकीला स्थगिती दिली. निवडणुकीसाठी शनिवार, 12 ऑगस्ट रोजी मतदान होणार होते. त्यापूर्वीच न्यायालयाने निर्णय जाहीर केल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2010 ची चॅम्पियन अनिता शेओरान आणि कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग हे डब्ल्यूएफआय अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी संजय सिंग यांच्या उमेदवारीमुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.
भारतीय कुस्ती महासंघाच्या 15 जागांसाठी 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदासाठी 4 उमेदवार रिंगणात असून महासचिव पदासाठी 3, उपाध्यक्षपदासाठी 6, सरचिटणीससाठी 3, कोषाध्यक्ष 2, सहसचिवसाठी 2 आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज केला आहे. अलीकडेच कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन केले होते. यादरम्यान ब्रिजभूषण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता.









