गिरीश चोडणकर यांची टीका : मडगावात मेणबत्ती मोर्चा
प्रतिनिधी / मडगाव
सध्या महिला कुस्तीपटूंना जी वागणूक मिळत आहे ती पाहिल्यास भाजपच्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित नाहीत हे सिद्ध होते. ज्या महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केले, ज्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी छायाचित्रे काढत होते, त्याच मोदींना आता त्यांच्या कार्यालयापासून 40 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जंतर-मंतर मैदानावर जाऊन त्यांची कैफियत ऐकून घेण्यास वेळ नाही, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.
सध्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि अन्य नागरिकांनी मडगावच्या लोहिया मैदानासमोर मेणबत्ती मोर्चा काढला. यात ’आप’चे आमदार वेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा, महिला नेत्या सिसील रॉड्रिग्स, प्रतिमा कुतिन्हो, वाल्मिकी नाईक, समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर तसेच अन्य उपस्थित होते.
प्रतिमा कुतिन्हो यांनी महिला कुस्तीपटूंना लवकर न्याय मिळावा आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी उचलून धरली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर सिसील रॉड्रिग्स यांनी जोरदार टीका केली. त्यांना गोव्यात येऊन खासगी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यास वेळ आहे. मात्र जंतर-मंतर येथे जाऊन त्या कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ नाही. ही शोकांतिका आहे, असे रॉड्रिग्स म्हणाल्या.