ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया : शाहू विजयी गंगावेश तालीमला दिली सदिच्छा भेट
कोल्हापूर :
राजर्षी शाहू महाराजांनी रुजवलेली मातीतील कुस्ती करतानाच मॅटवरील कुस्ती व सराव करणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर मल्लांनी ऑलिम्पिक हे आपले लक्ष्य ठेवावे. म्हणजे स्थानिकपासून जागतिक स्पर्धासाठीचा सराव आपोआपच होत राहतो. आपल्या देशात मल्लाने पदक जिंकले की त्याला सर्वकाही मिळते. परंतू पदक मिळवण्यासाठी मल्लांना आता सर्वकाही द्यावे लागले. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अॅक्शनमोडमध्ये येऊन शाहू विजयी गंगावेश तालमीचे नूतनीकरण्यापासून ते मल्लांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांनी रविवारी तालमीतील मल्लांना दिली.
बजरंग पुनिया हे विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्यानिमित्ताने कोल्हापूरात आले होते. रविवारी सकाळी गंगावेश तालीमला सदिच्छा भेट दिली. यानंतर तालमीचे अध्यक्ष नागेश साळोखे व वस्ताद विश्वास हारुगले यांनी पुनिया यांचे स्वागत केले. महाराष्ट्रबरोबर देशाला तगडे मल्ल दिलेल्या शाहू विजयी गंगावेश तालीमचे मला सतत स्मरण राहिलच. शिवाय ही तालीम सर्वबाजूंनी सुसज्ज करण्याला प्राधान्य द्यावे लागेल असे सांगत पुनिया यांनी मल्लांना प्रोत्साहीत केले. जो मल्ल मॅटवरील कुस्तीत पंधरा मिनिटे नॉनस्टॉप सराव करेल तो मातीतील कुस्तीत बराच वेळ मल्लांशी सहज लढू शकतो हे मल्लांनी ध्यानात घ्यावे, असा सल्ला दिला.
देशात कुस्तीचा विकास करण्यासाठी ग्रासरुटवर तयारी करावी लागेल, असे सांगून पुनिया म्हणाले, देशातील बहुतांश राज्यात कुस्तीचे ग्रासऊट तयार केलेले नाही. त्यामुळे देशात मल्लांची संख्या वाढताना दिसत नाही. शिवाय देशाच्या कुस्ती इतिहासात मल्लांनी फक्त सातच पदके ऑलिम्पिकमध्ये मिळवली आहेत. हे चित्र बदलून पदके वाढवण्यासाठी ग्रासऊटच बनवणे आहे. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, शाहू विजयी गंगावेश तालमीचे मल्ल माऊली जमदाडे, सिकंदर शेख उत्तम पाटील, मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पवार, भाकपचे गिरीश फोंडे, ऋषिकेश पाटील, संताजी भोसले, सुनील खिरुगडे व उदयसिंग देसाई आदी उपस्थित होते.
सरकारने आधी मनावर घ्यायला पाहिजे…
मल्लांनंतर बजरंग पुनिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय कुस्ती महासंघातील वादाबाबत विचारले असता पुनिया म्हणाले, देशातील कुस्तीक्षेत्रावर महासंघातील वादाचा विपरित परिणाम हात आहे. हा प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारनेच मनावर घेऊन लक्ष घालावे लागेल. तसेच वादाचे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळत ते मिटवावेही लागेल. जोपर्यंत वाद आहेत, तोपर्यंत समज गैरसमज वाढतच जातील, असेही पुनिया यांनी सांगितले.








