ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्याची मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आणि भारतातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामवंत कुस्तीपटू यांच्यातील वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या कुस्तीपटूंनी न्यायालयात याचिका सादर केली असून सिंग यांच्याविरोधात तक्रार नोंद करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी सोमवारी सलग दुसऱया दिवशीही आपले धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आदींचा समावेश आहे.
बजरंग पुनियाकडे नेतृत्व
या आंदोलनाचे नेतृत्व नामवंत पैलवान बजरंग पुनिया करीत आहेत. त्यांनी कुस्तीपटूंसाठी राजकीय पक्षांचे समर्थनही मागितले आहे. आपल्या मंचावर सर्व राजकीय पक्षांचे स्वागत आहे. आम्हाला न्याय हवा आहे. त्यासाठी आम्हाला सर्वांचे साहाय्य पाहिजे आहे. आम्ही खाप पंचायतीकडेही समर्थन मागितले आहे. मागच्या आंदोलनात खाप पंचायतींकडे आम्ही पाठिंबा मागितला नव्हता. मात्र, ती आमची चूक होती. आता आम्ही ती सुधारत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
निवडणूक लांबणीवर
कुस्तीपटूंच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. पुढचा आदेश येईपर्यंत निवडणूक घेण्यात येणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेने या निवडणुकीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्याची तयारी केली असून ही समिती भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाजही पाहणार आहे. एकप्रकारे आता भारतीय कुस्ती संघटना बंद झाल्यात जमा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आरोपांची चौकशी सुरु
कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी सुरु केली असून भारतीय ऑलिम्पिक्स संघटना आणि केंद्रीय क्रीडा विभाग यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल मागविला आहे. कुस्ती संघटनेच्या अहवालात ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात मौन पाळण्यात आले असून त्यामुळे कुस्तीपटू संतप्त झाले आहेत.
सत्यपाल मलिक यांची टीका
भारत सरकार एका बाजूला बेटी बचावचा नारा देत आहे. येथे कुस्तीपटू महिला गेले तीन महिने न्यायाची मागणी करीत आहेत. त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्यात आले आहे. केवळ खासदाराला वाचविण्यासाठी सरकार कुस्तीपटूंच्या करिअरशी खेळ करीत आहे, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला.
कुस्तीपटू रस्त्यावर
7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आरोप केले आहेत. त्यांनी महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. रविवारची रात्र या कुस्तीपटूंनी जंतरमंतरच्या पदपथावरच काढली. सोमवारी पत्रकार परिषदेतही त्यांनी साश्रू नयनांनी आपली व्यथा मांडली असून सर्वांकडे समर्थनाची मागणी केली आहे. आमच्याबरोबर राजकारण खेळले गेले असून सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. चार आठवडय़ांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तीन महिने झाले तरी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. आता आमच्या संयमाचा अंत झाला आहे. आम्ही न्यायालयात पोहचलो आहोत. तसेच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडे समर्थन मागत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.









