बबिता फोगटने फेटाळला साक्षी मलिकचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पानिपत
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून नवा वाद सुरू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी कुस्तीपटू साक्षी मलिकने पतीसोबतचा एक व्हिडिओ ट्विट करून अनेक मोठे खुलासे करत या आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचे सांगितले. भाजप नेत्या व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट आणि सोनीपतमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष तीर्थ राणा यांनीच आपल्याला जंतरमंतरवर धरणे करण्यास सांगितल्याचा दावा साक्षी मलिकने केला होता. या दाव्यावर साक्षीने एक पत्रही दाखवले असले तरी शनिवारी बबिता फोगटने यावर प्रत्युत्तर दिले. साक्षीने दाखविलेल्या कागदावर माझी स्वाक्षरी नव्हती, तसेच मी कधीही आंदोलनाच्या समर्थनात नव्हते असे बबिता फोगटने स्पष्टपणे सांगितले.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारे आंदोलक कुस्तीपटू सध्या सोशल मीडियाद्वारेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रश्नी साक्षी मलिकने एक व्हिडिओ ट्विट केल्यापासून वादाची नवी ठिणगी पडली आहे. साक्षी मलिकच्या दाव्यावर बबिता फोगटने रविवारी सोशल मीडियावरूनच उत्तर दिले आहे. साक्षीने दाखविलेल्या कागदावर माझी स्वाक्षरी नसल्याचे स्पष्टीकरण बबिताने दिले. तसेच आता साक्षी मलिकचे मनसुबे जनतेला समजले असून ती काँग्रेसच्या हातची बाहुली बनली आहे. आता तिचा खरा हेतू लोकांसमोर उघड करण्याची वेळ आली आहे, असे बबिता पुढे म्हणाली. बबिताने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, सत्य नक्कीच बाहेर येईल, असे वक्तव्यही केले आहे.
साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान यांनी शनिवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गेल्या 10-12 वर्षांपासून महासंघात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत आहे. तसेच कोणी आवाज उठवला तर त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकते असे म्हटले होते.









