133 धावांची भागीदारी ठरली निर्णायक, 5 गडय़ांनी विजयासह मालिका भारताकडे
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
मालिकावीर हार्दिक पंडय़ाची अष्टपैलू कामगिरी, सामनावीर रिषभ पंतचे पहिले धुवाधार शतक आणि गोलंदाजांनी केलेला शिस्तबद्ध मारा यांच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीत यजमान इंग्लंडला 5 गडय़ांनी धूळ चारत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. याआधी टी-20 मालिकाही भारताने याच फरकाने जिंकली होती.
हार्दिक पंडय़ाने वनडे कारकिर्दीतील नोंदवलेली सर्वोत्तम कामगिरी (24 धावांत 4 बळी) व इतरांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडचा डाव 46 व्या षटकातच 259 धावांत गुंडाळला. इंग्लंडतर्फे कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 60 धावांचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱया सामन्यात 6 बळी टिपलेल्या रीस टॉपलीने शिखर धवन (1), रोहित शर्मा (17) व विराट कोहली (17) यांना झटपट बाद केल्यानंतर तसेच सूर्यकुमारही (16) लवकर बाद झाल्यानंतर भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण 4 बाद 72 अशा स्थितीनंतर हार्दिक पंडय़ा व रिषभ पंत या दोन युवा खेळाडूंनी प्रथम सावध व नंतर स्थिरावल्यावर आक्रमक फटकेबाजी करीत संघाला विजयपथावर आणले. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली आणि हीच भागीदारी निर्णायक ठरली. 205 धावसंख्येवर हार्दिक बाद झाल्यानंतर पंतने जडेजासमवेत विजयाचे सोपस्कार 43 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा चौकार ठोकून पूर्ण करीत अविस्मरणीय विजय साकार केला. हार्दिक पंडय़ाने 55 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 71 धावा झोडपल्या तर पंतने 113 चेंडूत 16 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 125 धावा फटकावल्या. जडेजा 7 धावांवर नाबाद राहिला.
बटलरचे अर्धशतक
बटलरने इंग्लंडतर्पे सर्वाधिक धावा जमविल्या असल्या तरी अष्टपैलू हार्दिकने इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखत चार बळी घेण्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. जखमी जसप्रित बुमराहच्या जागी खेळणाऱया मोहम्मद सिराजने भारताला शानदार सुरुवात करून देताना आपल्या पहिल्या षटकातच बेअरस्टो व जो रूट यांना शून्यावर बाद केले. यावेळी इंग्लंडची स्थिती 2 बाद 12 अशी झाली होती. जेसॉन रॉयने शमीच्या पहिल्या षटकात तीन चौकार मारत या 12 धावा जमविल्या होत्या.
रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ओल्ड ट्रफोर्डवरील मागील 9 पैकी आठ सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजय झाल्याचे माहीत असूनही त्याने हा निर्णय घेतला. बुमराह नसल्यामुळे इंग्लंडच्या गोटात फारशी चिंता नव्हती. पण त्याच्या जागी आलेल्या सिराजने फलंदाजीस अनुकूल असणाऱया खेळपट्टीवर डावातील दुसऱयाच षटकात दोन बळी घेत धुमाकूळ घातला. बेन स्टोक्स व रॉय यांनी संघाला 66 धावांची मजल मारून दिल्यावर हार्दिकने पहिला बळी नोंदवताना रॉयला बाद केले. रॉयने 41 धावा करताना स्टोक्ससमवेत तिसऱया गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी केली.

हार्दिकने अचूक दिशा व टप्पा ठेवत फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्यातच त्याने स्टोक्सला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने 29 चेंडूत 27 धावा केल्या. रॉय बाद झाल्यानंतर भारताच्या अचूक माऱयापुढे इंग्लंडला 7 षटकांत केवळ 16 धावा जमविता आल्या. पुन्हा गोलंदाजीस आल्यावर बटलरच्या हेल्मेटला सिराजचा चेंडू दोनदा लागला. यावेळी फिजिओनी दोन्ही वेळेस त्याची तपासणी केली. पण बटलर ठीक होता. बटलरने नंतर चहलला लाँगऑनच्या देशेने षटकार मारला तर मोईन अलीनेही सिराजला षटकार मारला. नंतर पुन्हा एकदा त्यांनी याची पुनरावृत्ती केली.
स्थिरावलेला मोईन जडेजाने डीप स्क्वेअरलेगवरून धावत येत घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे बाद झाला. मोईनने 34 धावा केल्या. नंतर लिव्हिंगस्टोनने 27, विलीने 18, ओव्हर्टनने 33 चेंडूत 32 धावांचे योगदान दिल्याने इंग्लंडला अडीचशेचा टप्पा पार करता आला. बटलर व लिव्हिंगस्टोन यांनी सहाव्या गडय़ासाठी 49 धावांची भर घातली. बटलरलाही हार्दिकनेच बाद केले. त्याने 80 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारासह 60 धावा केल्या. लिव्हिंगस्टोननेही 31 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार, 2 षटकार मारले. 46 व्या षटकांत चहलने टॉपलीला त्रिफळाचीत करीत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. हार्दिकने 4, चहलने 3, सिराजने 2 व जडेजाने एक बळी मिळविला.
पंतची चौकारांची आतषबाजी
41 व्या षटकाअखेर भारताने 5 बाद 236 धावा जमविल्या होत्या. डेव्हिड विलीने टाकलेल्या 42 व्या षटकात पंतने सलग पाच चौकार ठोकत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना संपवणार, अशी अपेक्षा केली जात होती. पण त्याने त्यावर एक धाव घेत स्ट्राईक स्वतःकडेच राखला आणि रूटने टाकलेल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने चौकार ठोकत सामना संपवला. एजबॅस्टन येथील कसोटी शतक ठोकत पंतने इंग्लंड दौऱयाची सुरुवात केली आणि या सामन्यात नाबाद शतक नोंदवत दौऱयाची सांगता केली.
2015 पासून इंग्लंडचा हा मायभूमीतील तिसरा मालिका पराभव आहे. विशेष म्हणजे या तीनही मालिकातील निर्णायक सामना याच ओल्ड ट्रफोर्डवर झाला होता. येत्या मंगळवारपासून त्यांची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होणार आहे तर भारताची मालिका विंडीजविरुद्ध 22 जुलैपासून सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 45.5 षटकांत सर्व बाद 259 ः जेसॉन रॉय 41 (31 चेंडूत 7 चौकार), बेअरस्टो व रूट 0, स्टोक्स 27 (29 चेंडूत 4 चौकार), बटलर 60 (80 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), मोईन अली 34 (44 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), लिव्हिंगस्टोन 27 (31 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), डेव्हिड विली 18 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ओव्हर्टन 32 (33 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कार्से नाबाद 3, टॉपली 0, अवांतर 17. गोलंदाजी ः हार्दिक पंडय़ा 4-24, चहल 3-60, सिराज 2-66, जडेजा 1-21, शमी 0-38.
भारत 42.1 षटकांत 5 बाद 261 ः रोहित शर्मा 17 चेंडूत 4 चौकारांसह 17, धवन 1, कोहली 22 चेंडूत 3 चौकारांसह 17, पंत नाबाद 125 (113 चे
ंडूत 16 चौकार, 2 षटकार), सूर्यकुमार यादव 16 (28 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा 71 (55 चेंडूत 10 चौकार), जडेजा नाबाद 7, अवांतर 7. गोलंदाजी ः टॉपली 3-35, ब्रायन कार्से 1-45, ओव्हर्टन 1-54, विली 0-58.









