वृत्तसंस्था/ डब्लिन
आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोस लिटलची 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स संघाने निवड केली आहे. आयपीएलच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात जोस लिटलला संधी उपलब्ध झाली आहे. गुजरात टायटन्सचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंडय़ाकडे असून आशिष नेहरा या संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. दरम्यान, हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली आपल्याला खेळण्यास अधिक आवडेल, असे मत जोस लिटलने व्यक्त केले आहे.
2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी शुक्रवारी कोचीमध्ये क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावामध्ये आयपीएल स्पर्धेतील विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सच्या फ्रांचायजींनी 23 वर्षीय जोस लिटलला 4.4 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. लिटलने गुजरातचे आभार मानले आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या पदार्पणातच जेतेपद मिळविले आहे. लिटलने 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत 22 वनडे आणि 53 टी-20 सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जोस लिटलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली होती.









