वृत्तसंस्था/ माँट्रियल
येथे झालेल्या कॅनेडियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुल रेसिंगच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावताना फेरारीच्या कार्लोस सेन्झला मागे टाकले. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने या मोसमात दुसऱयांदा पोडियमवर येत तिसरे स्थान मिळविले. या विजयानंतर व्हर्स्टापेनने त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझवरील आघाडी 46 गुणांनी वाढविली आहे. व्हर्स्टापेनचे 175 तर पेरेझचे 129 गुण झाले आहेत.
व्हर्स्टापेनचे हे या मोसमातील सहावे आणि कारकिर्दीतील एकूण 26 वे जेतेपद आहे तर सेन्झने या मोसमात पाचव्यांदा पोडियमवर स्थान मिळविले. सातवेळचा चॅम्पियन हॅमिल्टनचा संघसहकारी जॉर्ज रसेलला चौथे तर फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने 19 व्या स्थानावरून सुरुवात करून पाचवे स्थान मिळविले. 70 लॅप्सच्या या शर्यतीच्या 49 व्या लॅपवेळी युकी सुनेदाची कार दुसऱया टर्नवर आदळल्याने सेफ्टी कार्सना प्रवेश करावा लागला. दुसऱया स्थानावरून सुरुवात करणाऱया अल्पाईनच्या फर्नांडो अलोन्सोला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले तर त्याचा संघसहकारी एस्टेबन ओकॉनने सहावे स्थान मिळविले. अल्फा रोमिओच्या व्हाल्टेरी बोटासने आठवे, त्याचाच संघसहकारी झोयू गुआनयूने नववे आणि ऍस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळवित शेवटचा गुण मिळविला. मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्दोला 11 वे, ऍस्टन मार्टिनच्या सेबॅस्टियन व्हेटेलने 12 वे तर विल्यम्सच्या ऍलेक्स अल्बॉनने 13 वे स्थान मिळविले. सुनेदाप्रमाणे हासच्या मिक शुमाकर, रेड बुलचा सर्जिओ पेरेझ यांनाही आठव्या वळणावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने निवृत्त व्हावे लागले.









