मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
कळंबा : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे होत आहेत. मंदिरात नवरात्र नऊ दिवस भजन , कीर्तन , आरती , पालखी असा सोहळा होतो. नवरात्रनिमित्य देवीची दररोज विविध रुपी पूजा केली जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरातील अंबाबाई देवीची आज चौथ्या माळेदिवशी चंद्रावर विराजमान झालेल्या चतुर्भुज रूपातील पूजा बांधण्यात आली.
मंदिरात १६ वर्ष वयाच्या युवकापासून ७८ वर्ष वयाच्या वृद्धापर्यंत एकूण 100 हुन अधिक नवरात्रकरी ९ दिवसांसाठी नवस फेडण्यासाठी बसले आहेत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या माळेच्यादिवशी श्री अंबाबाई देवीची चंद्रावर विराजमान झालेली, चतुर्भुज रूपातील पूजा बांधली होती. या पूजेच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाईची भारताच्या इस्रो या यशस्वी चांद्रयान मोहिमेचा देखावा उभारण्यात आलाय. ही पूजा या मंदिराचे पुजारी अनिल गुरव, भिकाजी गुरव, दिगंबर गुरव, महेश गुरव, महादेव गुरव, अशोक गुरव, प्रथमेश गुरव, कमलाकर गुरव, राजेंद्र गुरव, प्रवीण गुरव आणि प्रदीप गुरव यांनी बांधली. या मंदिरातील धार्मिक विधीचे सर्व कार्यक्रम अमर कुलकर्णी हे करत आहेत. कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) गावचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. येथील अंबाबाई मंदिराला सुमारे १२१ वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. श्री महालक्ष्मी देवीची करवीर महात्म्यात पौराणिक कथेत नोंद आहे.
त्यामध्ये कळंबेश्वरी ही देवी कोल्हासुराची पत्नी असल्याचे सांगितले जाते. कळंबेश्वरी व कोल्हासूर यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीची तपश्चर्या केल्यावर श्री महालक्ष्मीने प्रसन्न होऊन या पती-पत्नींना वरदान मागण्यास सांगितले. कोल्हासूर त्यावेळी कळंबेश्वरी व यांनी करवीर देशाचे निष्कलंक राज्य करण्यास मिळावे (आताचे कोल्हापूर) असा वर मागितला. तसे महालक्ष्मीनेही वरदान दिले; पण कोल्हासुराच्या दोन पुत्रांनी देवदेवतांवर हल्ला करून त्रास देण्यास सुरुवात केल्याने श्री महालक्ष्मीने या पुत्रांचा वध केला. कोल्हासुराला आपल्या पुत्रांचा वध सहन न झाल्याने त्याने महालक्ष्मीबरोबर देवदेवतांवर आक्रमण केले. यामध्ये कोल्हासुराचा वध झाला; पण याही परिस्थितीत शिवभक्त असणारी कळंबेश्वरीचे देवता म्हणून स्थान अबाधित राहिले. कालांतराने याच देवीला लक्ष्मीचे एकरूप मानले जाऊ लागले. सुमारे १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या कोल्हापूर शहरापासून अगदी जवळचे शाहूकालीन गाव म्हणून कळंबे तर्फ ठाणे कळंबा (तलाव) म्हणून ओळखले जाते. बुधवारी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात अंबाबाई देवीची चंद्रावर विराजमान झालेली, चतुर्भुज रूपातील पूजा बांधली होती.









