मूर्ती प्रतिष्ठापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त
बेळगाव : श्री शंभूतीर्थ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला 4 एप्रिल रोजी 25 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शंभूतीर्थ पूजन संघ आणि अमरनाथ यात्रा संघ यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात झाली. महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक घालण्यात आला. अमोल केसरकर, संभाजी मेलगे, तानाजी मेलगे यांच्या हस्ते पूजन करून मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अंकुश केसरकर म्हणाले, गोव्याच्या स्वारीवर जाताना धर्मवीर संभाजी महाराजांनी शंभू जत्तीमठ येथील मंदिरामध्ये पूजा केली व पुढे ते गोव्याच्या स्वारीवर पश्चिम घाटातून रामघाटमार्गे गेले. त्यामुळे या जागेचे महत्त्व आणखीन वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. अमरनाथ यात्रा ग्रुपतर्फे शंभूभक्तांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रामकृष्ण सुतार, अजित बांदेकर, संतोष कुसाणे, गजानन निलजकर, अतुल केसरकर, दिगंबर कातकर, किरण बडवाण्णाचे आदी शंभूभक्त उपस्थित होते.









