कोल्हापूर : शारदिय़ नवरात्रौत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईची विविध रुपात पुजा मांडली जाते. आज 27 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या द्वितीया तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात पुजा मांडली आहे.
दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप होय. महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. आध्यायात त्या वेळेला दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या रूपात देवी भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान झाली आहे. देवीच्या हातामध्ये शंख, चक्र, खड्ग, धनुष्य, बाण, वरद, कमळ, त्रिशुळ, तलवार आदी आयुधं धारण केली आहेत.
दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी शक्ती या रूपाचा बोध होतो. आजच्या द्वितीया तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी जगदंबेचे रूप देवी कवचात वर्णन केलेल्या नवदुर्गांनी युक्त अष्टभुजा स्वरूप साकारले आहे. देवीची पुजा अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी बांधली.









