पैसे गोळा करणाऱया एजंटाने केलेत हात वर
प्रतिनिधी/ सातारा
कमी श्रमात जास्त पैसे मिळण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. तर काहीजण आपल्या पोटाला चिमटा काढून बचत करुन साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मार्केटींग करणारे आपल्या कंपनीकडून कसा फायदा होणार हे पटवून दिले की लगेच भूलतात. असाच काहीसा प्रकार सातारा जिल्हा परिषदेत घडलेला आहे. गोवा आणि पुणे येथे सुवर्णभूमी रिऑलीटी मॅनेजमेंट प्रा. लि. नावाच्या कंपनीच्या एजंटाकडून जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱयांकडून महिन्याला काही रक्कम गोळा केली. गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीचे कामकाज बंद झाल्याने सेव्हींग करणाऱया कर्मचाऱयांचे चांगलेच धाबे दणाणले असून संबंधित एजंटानेही हात वर केलेले आहेत.
गुंतवणूक करणाऱया अनेक कंपन्या आहेत. त्यामध्ये काही कंपन्यांकडून मार्केटींग फंडा वापरला जातो. अशा कंपन्या कमी कालावधीत जास्त पेसे मिळवून देण्याच्या भानगडीत अनेकजणांनी आपल्या जवळची असलेली जमापूंजीही घालवून टाकल्याची आपण पहातो. साताऱयात अनेक जण आजही ट्विकलं, पर्ल्स यासारख्या कंपन्यामध्ये गुंतवलेले पैसे परत भेटतील याकडे आशा लावून बसलेले आहेत. अशापैकीच सुवर्णभूमी रिएलॅटी मॅनेजमेंट नावाची कंपनी पाळे रुजवू लागली. जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱयाने त्याची एंजटगिरी सुरु केली. काही कर्मचाऱयांनी त्याच्या विश्वासाखातर महिनाकाठी जमेल तेवढी रक्कम त्या एजंटाकडे जमा करण्यास सुरुवात केली. त्या रक्कमेवर ठराविक मुदतीनंतर ज्यादा रक्कम मिळणार होती. नियमीत पैसे भरले जात होते. परंतु काही महिन्यांपासून या कंपनीच्या त्या एजंटाकडून पैसे घेणेच बंद केले. दरम्यान, संबंधित गुतंवणूक करणाऱया कर्मचाऱयांनी आपले पैसे का घेत नाही. किमान दिलेले पैसे तरी परत देणार काय अशी विचारणा केली असता त्या एंजटाकडून पुढचा व्यक्ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दिलेल्या पावत्यावर कोणताही संपर्क नंबर नाही. कार्यालयाचा पत्ता गोवा आणि पुण्याचा आहे. त्यामुळे पैसे परत मिळवण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा असा प्रश्न गुंतवणूक करणाऱया कर्मचाऱयांसमोर पडला आहे. दरम्यान, महिनाकाठी गुंतवणूक केलेली रक्कम ही 200 ते 1000 रुपयांपर्यंतची असल्याने आणि आतापर्यंत साठलेले पैसे परत मिळण्यासाठी त्याची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न गुंतवणूक करणाऱयांच्यापुढे पडला आहे. असेच एका गुंतवणूक करणाऱयांने आपल्या व्यथा तरुण भारतकडे मांडल्या असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
त्या एजंटाने ठेवले कानावर हात
एका विभागात वरीष्ठ पदावर काम करणाऱया या कंपनीच्या एजंटाकडे गुंतवणूक करणाऱया कंपनीच्या ठेवीदारांनी विचारणा केली असता त्या एजंटाने कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे गुतंवलेले पैसे परत कसे काढायचे याचीच चिंता व्यक्त होत आहे.