ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील लवासा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. डार्विन प्लॅटफॉर्म समूहाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
लवासामध्ये उभारण्यात येणारा हा पुतळा गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्यापेक्षा उंच असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर आहे. तर, मोदींचा पुतळा 190 ते 200 मीटर उंच असणार आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना डार्विनचे प्रमुख अजय हरिनाथ सिंह म्हणाले, देशातील अखंडता टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या निमित्ताने देशाला दूरदर्शी नेता मिळाला आहे. त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्याकरता त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.