उत्तरप्रदेशातील सिटी मॉन्टेसरी स्कूलला (सीएमएस) जगातील सर्वात मोठय़ा शाळेचा मान प्राप्त आहे. ही शाळा लखनौ शहरात असून याची स्थापना डॉ. जगदीश गांधी आणि डॉ. भारती गांधी यांनी 1959 साली केली होती. सीएमएसमध्ये सद्यघडीला 20 कॅम्पसांमध्ये 58 हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत, तर 4,500 हून अधिक कर्मचारी या शाळेत कार्यरत आहेत. या शाळेचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्येप्रकरणी या शाळेला हा मान मिळाला आहे. शहरभरात फैलावलेल्या 20 कॅम्पसांसह या शाळेत 1 हजाराहून अधिक वर्ग आहेत. तर 3700 संगणक आहेत. शाळेत 4500 कर्मचाऱयांची एक पूर्ण फौजच असून यात शिक्षक, सहाय्यक कर्मचारी, सफाई कर्मचारी, रिक्षाचालक आणि इलेक्ट्रिशियन देखील सामील आहे.

जगातील सर्वात मोठी शाळा कशाप्रकारे संचालित होते हे जाणून घेण्यासाठी अनेक देशातील लोक येथे येत असतात. या शाळेत 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान कशाप्रकारे केले जाते याचे कुतुहूल विदेशातही दिसून येते. 2013 मध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाल्यावर या शाळेला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सप्टेंबर 2015 मध्ये एज्युकेशनल वर्ल्ड या नियतकालिकाकडून या शाळेला भारताची सर्वोत्तम शाळा ठरविण्यात आले होते.









