हजारो विमाने पोहोचली भंगारात
तुम्ही आजवर दफनभूमीत लोकांचे मृतदेह दफन करताना पाहिले असतील. परंतु कधी विमानांच्या अंत्यभूमीबद्दल ऐकले आहे का? जगात एक असे ठिकाण आहे, ज्याला विमानांचे कब्रिस्तान म्हटले जाते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येत भंगार ठरलेली विमाने ठेवण्यात आली आहेत. या विमानांमधील सुटे भाग काढून घेत त्याची बाहेरील बॉडी तशीच ठेवण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून ही भंगारातील विमाने जमा होत असल्याने हे ठिकाण आता प्लेन्स ग्रेव्हयार्ड ठरले आहे.
एरिझोनातील डेविसमोंथान एअरफोर्स बेसला जगातील विमानांची सर्वात मोठी अंत्यभूमी म्हटले जाते. येथे सुमारे साडेचार हजार विमाने उभी आहेत. एखादे विमान निरुपयोगी ठरल्यावर ते येथे आणून उभे केले जाते. यातील उपयोगी सुटेभाग काढून घेत ते इतर विमानांच्या निर्मितीत वापरले जातात. तर बाहेरील बॉडी तशीच पडून राहते.
या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून सुमारे साडेचार हजार विमाने उभी आहेत. यातील काही विमानांचा वापर नासाने देखील केला आहे. पूर्वी या ठिकाणी पर्यटक येऊ शकत होते, परंतु मागील काही काळापासून येथे लोकांवर बंदी घालण्यात आली आहेत. या विमानांच्या ग्रेव्हयार्डमध्ये सुमारे 500 हून अधिक कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त येथे प्रवेश करण्याची अनुमती कुणालाच नाही.









