आग्वाद किल्ल्यावर मुख्य सोहळा, : मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांची उपस्थिती
पणजी : जागतिक योग दिनानिमित्त आज बुधवार दि. 21 रोजी राजधानी पणजीसह राज्यभरात विविध संस्था, सामाजिक संघटना यांच्यासह सरकारी पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपातळीवरील मुख्य सोहळा सिकेरी येथे आग्वाद किल्ल्यावर होणार आहे. सकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची उपस्थिती लाभणार आहे. राजधानीतील मुख्य सोहळा ताळगाव येथे पंचायत सभागृहात होईल. त्यात भारत स्वाभिमान गोवाचे अध्यक्ष कमलेश बांदेकर योग प्रशिक्षण देतील. या संस्थेतर्फे राज्यात शेकडो योग प्रशिक्षक तयार करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके होतील आणि उपस्थित नागरिकांकडून योग सराव करून घेण्यात येईल. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतील श्रीमहालक्ष्मी मंदिरात दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात श्रद्धा परब, अथर्व व वैष्णवी यांच्यातर्फे उपस्थितांना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील बहुतेक सर्व शाळांमध्येही योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लाखो विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहे. तसेच सरकारच्या विविध खात्यामधील कर्मचाऱ्यांनाही आपापल्या कार्यालयात योग प्रात्यक्षिके करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार किमान 50 हजार कर्मचारी त्यात भाग घेणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकही भाग घेणार असून सूर्यनमस्कारासह योग प्रात्यक्षिके करणार आहेत.









