वजन 500 किलो, बॉम्बशोधक पथक बॉम्ब निकामी करण्यात व्यस्त
वृत्तसंस्था/ डसेलडॉर्फ
जर्मनीतील डसेलडॉर्फ येथे सोमवारी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडला. यानंतर शहरातील 13 हजार लोकांना तात्पुरते घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेत बनवलेल्या या बॉम्बचे वजन 500 किलो आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी उपस्थित असून ते बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्राणिसंग्रहालयाजवळ काम करणाऱ्या कामगारांना हा बॉम्ब सापडला. त्यानंतर आजूबाजूच्या 500 मीटर परिसरातून लोकांना हटवून रस्ते बंद करण्यात आले. शहरातील दोन शाळांमध्ये लोकांना हलवण्यात आले. तसेच शहरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. याशिवाय लोकल बस आणि ट्राम सेवाही बंद करण्यात आली होती.
जर्मनीतील अनेक शहरांमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करताना असे बॉम्ब सापडतात. यापूर्वी 2021 मध्ये म्युनिकमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडल्यानंतर स्फोट होऊन त्यात 4 जण जखमी झाले होते. 2020 मध्येही फ्रँकफर्टमध्ये ब्रिटिश बॉम्ब सापडल्यानंतर सुमारे 13,000 लोकांना तात्पुरते घर सोडावे लागले होते. 2017 मध्ये फ्रँकफर्टमध्येच 1,400 किलो वजनाचा बॉम्ब सापडल्यानंतर सुमारे 65 हजार लोकांना आपले घर सोडावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1940 ते 1945 दरम्यान, अमेरिक आणि ब्रिटन एअरफोर्सने युरोपवर अनेक बॉम्ब टाकले. त्यापैकी निम्म्याहून अधिक बॉम्ब जर्मनीत पडले होते.