वृत्तसंस्था/अॅथेन्स
शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्व शॉटगन नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे सहा नेमबाज सहभागी होत आहेत. अनंतजित सिंग नरुकाच्या नेतृत्वाखाली भारताचे सहा सदस्य या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेमध्ये भवतेगसिंग गिल याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. महिलांच्या विभागात भारताची ऑलिम्पिक नेमबाजपटू रेझा धिल्लाँ, गनेमत सेखाँ आणि परिनाझ धालीवाल सहभागी होत आहेत. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे सुमारे 121 नेमबाज सहभागी झाले आहेत. अमेरिकेचा व्हिसेंट हेनकॉक, तसेच भारताचा मैराझ हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हेनकॉक या अमेरिकन स्किट नेमबाजाने चारवेळा ऑलिम्पिक चॅम्पियनशिप तसेच तीनवेळा विश्व चॅम्पियनशिप मिळविली आहे. भारताचा मैराझ आंतरराष्ट्रीय स्कीट नेमबाजी स्पर्धेत आता वैयक्तिक तिसरे पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेता कॉनेर प्रिन्स तसेच फिनलँडची इटू केलोनेन आणि इजिप्तची आझमी मेहलबा हे स्पर्धक प्रमुख आकर्षण राहतील. या स्पर्धेत महिलांच्या विभागात विविध देशांचे 63 नेमबाज भाग घेत आहेत. धिल्लाँने यापूर्वी कनिष्ठांच्या विश्वचषक स्किट स्पर्धेत रौप्य मिळविले होते.









