वृत्तसंस्था/रोम
इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर ज्योर्जियो अरमानी यांचे गुरुवारी निधन झाले. निधनसमयी ते 91 वर्षांचे होते. ज्योर्जियो अरमानी यांच्या निधनाने फॅशन जगतातील एका युगाचा अंत झाला आहे. ‘अरमानी ग्रुप’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची माहिती व्हायरल केली. ‘अरमानी ग्रुपचे निर्माते, संस्थापक आणि अथक प्रेरणास्थान ज्योर्जियो अरमानी यांचे निधन झाले आहे’, असे ट्विट करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अरमानी यांनी पॅरिस, फ्रान्स येथे ज्योर्जियो अरमानी ग्रुपच्या हॉट कॉउचर स्प्रिंग/समर 2025 कलेक्शन शोच्या शेवटी हजेरी लावली होती. हा त्यांचा स्टेजवरील शेवटचा शो ठरला. रे ज्योर्जियो किंवा किंग ज्योर्जियो म्हणून ओळखले जाणारे ज्योर्जियो अरमानी हे जागतिक फॅशन जगतातील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक होते.
ते त्यांच्या अतिशय साध्या, सौम्य पण अत्याधुनिक डिझाइनसाठी ओळखले जातात. त्यांच्या डिझाइनमध्ये आधुनिक अभिजाततेसह उत्तम कारागिरीचा समावेश होता. 1934 मध्ये इटलीतील पिआसेंझा येथे जन्मलेल्या अरमानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विंडो ड्रेसर म्हणून केली. 1970 च्या दशकात डिझायनर म्हणून त्यांनी जगभर प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्यांनी फॅशन जगात बराच काळ आघाडीची भूमिका बजावली. 1975 मध्ये स्थापन झालेल्या त्यांच्या स्वत:च्या नावाच्या लेबल अरमानीने पुरुषांच्या पोशाखात स्वच्छ कट आणि सॉफ्ट टेलरिंगसह क्रांती घडवली. नंतर ते महिलांच्या फॅशन, अॅक्सेसरीज, सुगंध आणि लक्झरी जीवनशैली उपक्रमांपर्यंत विस्तारली. केवळ रॅम्प वॉकच नाही तर त्याची कीर्ती हॉलिवूडच्या रेड कार्पेट, बॉलिवूड, जागतिक नेते आणि जागतिक शैलीपर्यंत पसरली आहे.









