कला ही वस्तू किंवा साधनांमध्ये नसून कलाकाराच्या बुद्धीत किंवा अंत:करणात असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. संगीताची उपजत कला असणारा कलाकार लाकडांच्या निर्जीव ठोकळ्यांमधूनही सुश्राव्य संगीत निर्माण करु शकतो. प्रत्येक प्रतिभावंताचे असेच असते. त्यांच्या हातात जी साधने पडतात त्यांच्यातून ते आपला कलाविष्कार प्रदर्शित करतात. आपण जेवण किंवा खाणे झाल्यानंतर दात स्वच्छ करण्यासाठी ‘टुथपिक’ उपयोगात आणतो. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या लेखी टुथपिक या वस्तूची किंमत त्यापेक्षा अधिक नसतेच. पण एक कलाकार या टुथपिनमधूनही कलेचा विश्वविक्रमी आविश्कार सादर करु शकतो.
पंजाबमधील अमृतसर शहरातील एका सरकारी शाळेतील शिक्षण बलजिंदरसिंग मान यांनी हा विक्रम केला आहे. लोकांनी उपयोग करुन फेकून दिलेल्या टुथपिक संकलित करुन त्यांनी त्यांच्यापासून सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत. या कलाकृतींमध्ये पेंटिंग्जपासून पडद्यापर्यंतच्या वस्तू आहेत. आपल्या या कलाकृतींमध्ये त्यांनी अशा प्रकारे टुथपिकसारख्या टाकावू वस्तूचा उपयोग केला आहे, की मान यांना हे सुचते कसे, असा प्रश्न सारेजण विचारतात. 2016 पासून ते अशा कलाकृती निर्माण करत आहेत. शाळेतले अध्यापनाचे काम करुन फावल्या वेळाचा उपयोग त्यांनी आपली ही ‘टुथपिक कला’ जोपासण्यासाठी केला आहे. बलजिंदरसिंग हे पर्यावरणप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींमधून त्यांचे निसर्गप्रेम बहरुन येते. त्यांचा जागतिक स्तराचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावाने आज 7 विश्वविक्रम नोंदले गेले आहेत. मात्र, ते केवळ कलास्वप्नांमध्ये रमणारे नाहीत. वास्तविकतेचेही त्यांना भान आहे. त्यांनी अनेक हजार वृक्षांचीही लागवड केली आहे. आज त्यांचे नाव गाजत आहे.









