नागालँडविरुद्ध 15 चौकार, 11 षटकारासह 181 धावांची खेळी : मुंबईचा 189 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मुंबईकर आयुष म्हात्रेने लिस्ट ए क्रिकेटमधील मोठा विक्रम रचला आहे. 17 वर्षांचा आयुष लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. मुंबई विरुद्ध नागालँड या मॅचमध्ये आयुष ओपनिंगला उतरला होता. त्याने फक्त 117 बॉलमध्ये 181 धावांची वादळी खेळी केली. यावेळी त्यानं मुंबईकर यशस्वी जैस्वालचा रेकॉर्ड मोडला. या वर्षाच्या सुरुवातीला शेष भारताविरुद्धच्या मॅचमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आयुषयनं अगदी कमी कालावधीमध्ये क्रिकेट जगतामध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईने नागालँडचा तब्बल 189 धावांनी धुव्वा उडवला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर मंगळवारी मुंबई आणि नागालँड यांच्यात विजय हजारे ट्रॉफी सामना खेळला गेला. या सामन्यात नागालँडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या डावाची सुरुवात आयुष म्हात्रे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी झाली. रघुवंशी 56 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतरही आयुषने आक्रमक बॅटिंग सुरु ठेवत लिस्ट ए क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकावली. त्याची डबल सेंच्युरी 19 रन्सनी हुकली. आयुषने अवघ्या 117 बॉलमध्ये 15 फोर आणि 11 सिक्ससह 181 रन काढले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 154.70 इतका होता. सिद्धेश लाड (39), प्रसाद पवार (38) यांनी त्याला चांगली साथ दिली.
शार्दुलचीही तुफानी फलंदाजी
आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर कर्णधार शार्दुल ठाकुरनेही तुफानी फलंदाजी करताना नागालँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. शार्दुलने अवघ्या 28 चेंडूत 2 चौकार व 8 षटकारासह नाबाद 73 धावांची तुफानी खेळी साकारली. आयुष व शार्दुल यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांत 7 बाद 403 धावांचा डोंगर उभा केला.
नागालँडचा 189 धावांनी उडवला धुव्वा
प्रत्युत्तरात मुंबईने विजयासाठी दिलेल्या 404 धावांचा पाठलाग करताना नागालँडला 9 बाद 214 धावापर्यंतच मजल मारता आली. नागालँडकडून सलामीवीर रुपेरोने 53 धावांची खेळी साकारली तर जगदीश सुचिथने सर्वाधिक 97 चेंडूत 104 धावांचे योगदान दिले. इतर नागालँडचे फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने नागालँडला या सामन्यात 189 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने तीन तर रोस्टन दासने 2 गडी बाद केले.
यशस्वी जैस्वालचा मोडला विक्रम
17 वर्ष 168 दिवस वय असलेला आयुष लिस्ट ए क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 150 रनचा टप्पा ओलांडणारा सर्वात कमी वयाचा भारतीय बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड मुंबईच्याच यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. यशस्वीने 2019 साली झारखंडविरुद्ध 17 वर्ष 291 दिवस वय असताना हा विक्रम केला होता.
लिस्ट ए क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 150 पेक्षा रन करणारे युवा भारतीय
17 वर्ष 168 दिवस – आयुष म्हात्रे (मुंबई)
17 वर्ष 291 दिवस – यशस्वी जैस्वाल (मुंबई)
19 वर्ष 63 दिवस – रॉबिन उथप्पा (कर्नाटक)









