दापोली :
शिवकालीन शस्त्र परंपरेमधील युद्ध कौशल्य सरावाचे प्रमुख शस्त्र राहिलेल्या लाठीकाठीचा आता भारतीय क्रीडा प्रकारात समावेश होऊ लागला आहे. अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तसेच काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरही या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या खेळाकडे समस्त क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधण्यासाठी दापोलीत रविवारी एक तास, एक मिनिट एक सेकंद लाठीकाठी फिरवून विश्वविक्रम करण्यात आला असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी जिल्हा लाठीकाठी स्पोर्टस् असोसिएशन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दापोली आणि खेड तालुक्यातील क्रीडा शिक्षक सुरेंद्र शिंदे आणि लाठीकाठी क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय निर्णायक पंच कविता शिंदे यांच्या पुढाकाराने या अनोख्या विश्वविक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सर्वाधिक वेळ लाठीकाठी फिरवण्याचा विश्वविक्रम होता.
विविध वयोगटातील ७५ मुले, मुली, महिला आणि पुरुष खेळाडू यात सहभागी झाले होते.








