अवघ्या 90 मिनिटांत 10 लाख तर एका दिवसात 1 कोटी सबस्क्राइबर्स : रोनाल्डोचा यु-ट्यूबवर झंझावाती ‘गोल’
वृत्तसंस्था /लंडन
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा विक्रमासाठी ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानावर त्याच्या नावे असंख्य विक्रम आहेत. आता रोनाल्डोने सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घातला आहे. रोनाल्डोने 21 ऑगस्ट रोजी युट्यूबवर पदार्पण केलं आणि अवघ्या 90 मिनिटांत विश्वविक्रम केला. रोनाल्डोचे यूट्यूब चॅनल सक्रिय झाल्यानंतर अवघ्या 90 मिनिटांत त्याला 1 मिलियन (10 लाख) फॉलोअर्स मिळाले. यासह तो युट्यूबच्या इतिहासात सर्वात जलद 10 लाख सबक्राइबर्स पूर्ण करणारा सेलिब्रिटी बनला आहे. यूट्यूबवर ज्या चॅनलचे 10 लाख सबक्राइबर्स पूर्ण होतात, त्यांना गोल्डन बटन दिले जाते. रोनाल्डोलाही हे बटन मिळाले आहे.
39 वर्षीय पोर्तुगीज फुटबॉलपटूने 21 ऑगस्ट रोजी ‘यूआर ख्रिस्तियानो’ चॅनल सुरु केले. चॅनल सुरु झाल्याची घोषणा करताना त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली, ‘प्रतीक्षा संपली. माझे युट्यूब चॅनेल अखेर रिलीज झाले आहे! या नवीन प्रवासात सामील व्हा. विशेष म्हणजे, रोनाल्डोच्या पोस्टनंतर अवघ्या 90 मिनिटांतच चॅनेलच्या सदस्यांची संख्या 10 लाखापर्यंत गेली. युट्यूब चॅनेल काढल्यानंतर अनेकांना सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. पण रोनाल्डोची लोकप्रियताच इतकी तुफान आहे की ज्यासाठी आयुष्यभर लोक झटतात ते त्याने काही क्षणात करुन दाखवले आहे. बुधवारी चॅनेल लाँच केल्यानंतर एका दिवसात तब्बल 13 मिलियन (1.3 कोटी) हून अधिक सदस्यांनी सबस्क्राइब केले आहे.
रोनाल्डोची डिजीटल विश्वातील झलक
रोनाल्डो जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे. ट्विटरवर त्याचे 112 मिलियन (11.2 कोटी) फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर त्याचे 170 मिलियन (17 कोटी) आणि इंस्टाग्रामवर 636 मिलियन (63.6 कोटी) फॉलोअर्स आहेत. आता, युट्यूब चॅनेल सुरु करत डिजीटल विश्वातील आणखी एका प्रवासाला त्याने सुरुवात केली आहे. आपल्या चॅनेलविषयी बोलताना रोनाल्डो म्हणाला, चाहत्यांना या चॅनेलवर त्याच्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. येथे तो त्याचं कुटुंब, ट्रेनिंग, शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करेल. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नातं निर्माण करणं मला नेहमीच आवडतं. यूट्यूबच्या माध्यमातून मला चाहत्यांशी जोडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल.
एका दिवसात वर्ल्ड रेकॉर्ड
रोनाल्डोने चॅनेल लाँच करताच अनेक व्हिडिओ पोस्ट केले. ज्यामध्ये एक टीझर ट्रेलर आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जसह एक मजेदार क्विझ गेम समाविष्ट आहे. यासोबतच त्याने 2022 मध्ये न्यूयॉर्कमध्ये मादाम तुसाँसोबत त्याच्या मेणाच्या पुतळ्याच्या लॉन्चिंगची क्लिपही पोस्ट केली होती. चॅनेल लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केले. अवघ्या 90 मिनिटांत त्याने 10 लाख फॉलोअर्स मिळवले. यामुळे युट्यूबवर सर्वात वेगाने 10 लाख फॉलोअर्स गाठणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या कामगिरीसह त्याने हॅमस्टर कॉम्बॅट गेम चॅनेलचा विक्रम मोडित काढला. हॅमस्टर कॉम्बॅटने
हा टप्पा सात दिवसात गाठला होता पण रोनाल्डोच्या
चॅनेलने अवघ्या एका दिवसात हा विक्रम मागे टाकला. दरम्यान, रोनाल्डोचे काही मिनिटांमध्ये 10 दशलक्षहून अधिक सबक्राइबर झाल्यानंतर त्याला युट्युबने काही तासांमध्ये गोल्डन प्ले बटन सुद्धा त्याच्या घरी पोहोचवले आहे. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.









