कोरोनानंतर स्थुलतेत सर्वाधिक वाढ झाल्याचे स्पष्ट : मोबाईलचे अतीवेड, व्यायामाचा अभाव कारणीभूत, तरूणाईमध्ये लठ्ठपणात चौपट वाढ, मॅटॉबॉलिक डिसऑर्डरमध्ये वाढ
कृष्णात पुरेकर कोल्हापूर
World Obesity Day Special : कोरोनापुर्वी लठ्ठपणाची समस्या कमी होती, पण कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण अन् शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांत स्थुलता वाढत गेली. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांत मोबाईलचे वेड वाढत गेले. त्यातून त्यांच्यात स्थुलता, वजन वाढल्याने काही समस्या समोर आल्या. जिल्ह्यात दीड ते टक्के शालेय विद्यार्थी लठ्ठपणाची शिकार ठरले आहेत. तरूणाईत स्थुलतेचे प्रमाण चौपट आहे. शनिवारी देशभर जागतिक स्थुलता दिन झाला. यादिवशी झालेल्या आरोग्य तपासणीतून भारतीयांच्या बॉडी मास इंडेक्ससाठी वाढता लठ्ठपणा हा धोक्याचा इशारा आहे.
टीव्ही येण्यापुर्वी मुले घरात कमी अन् मैदानावर अधिक असायची, पण त्यानंतर मोबाईल क्रांतीने गेल्या 20 वर्षात चित्रच बदलले. गतीमान अन् बदलती जीवनशैली, फास्टफूड, जंकफुडचा अतिवापर, व्यायामाचा अभाव याचे दृश्य परिणाम लठ्ठपणातून समोर आले आहेत. जगात लठ्ठपणाच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली.
भारतात 5 वर्षांपुर्वी लठ्ठ व्यक्तींची संख्या 14 कोंटीवर होती. गतवर्षी आरोग्य आणि सामाजिक निर्देशांकासाठी व्यापकपणे झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये लट्ठपणाचे प्रमाण पुरूषांमध्ये 23 तर महिलांमध्ये 24 टक्के इतके वाढले आहे. अनेकांचा बॉडी मास इंडेक्स 25 हून अधिक असल्याचे समोर आले आहे. 2016 च्या तुलनेत हे प्रमाण चौपट आहे. 5 वर्षापुर्वी मुलांमध्ये स्थुलतेचे प्रमाण 2 टक्के होते. ते आता साडेतीन टक्क्यांवर पोहोचले असून त्यात दीडपट वाढ झाली आहे. परिणामी मुलांमधील स्थुलता नियंत्रणासाठी केंद्र, राज्य सरकारने शनिवारी स्थुलता प्रतिबंधक आणि जनजागृती मोहीम राबवली.
मुलांमधील वजनवाढीसाठी अतिमोबाईलचा वापर, मोबाईलवरील गेम, स्वस्त अन् मेदयुक्त पदार्थांचा अतिवापर कारणीभूत ठरला आहे. 18 वर्षांवरील वयोगटात बदलती, व्यस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणे समोर आली आहेत. स्थुलतेमुळे हृदयविकार, नपुसंकत्व, मधुमेह, तेरा प्रकारचे कर्करोग, फुफ्फुसाशी निगडीत विकाराचा धोका वाढला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वांधिक तिप्पट व्यक्ती या स्थुलताग्रस्त होत्या, अशी माहिती इंटरनॅशनल फेडरेशन फॉर दी सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटॅबॉलिक डिसऑर्डर संस्थेने दिली आहे.
शहरात स्थुलतेचे पावणेदोन टक्के शालेय विद्यार्थी
शहरातील 5 शाळांतील 1 हजार विद्यार्थ्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 5 पथकांनी शनिवारी तपासणी केली. यामध्ये 771 विद्यार्थ्यांपैकी 371 मुली आणि 390 मुलींचा समावेश आहे. यापैकी 13 विद्यार्थी लठ्ठपणाची शिकार असल्याचे समोर आले. या सॅम्पल सर्व्हेत शहरातील लठ्ठपणाचे प्रमाण पावणेदोन टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात लठ्ठपणाची टक्केवारी सरासरी दीड ते 2 टक्के असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरीष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता परितेकर यांनी दिली.
बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय
व्यक्तीचे वजन आणि उंची यांचे मोजमाप करून तिचा शारिरीक निर्देशांक बॉडी मास इंडेक्स काढला जातो. बीएमआयपेक्षा अधिक वजन असेल तर लठ्ठपणा मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 25 पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या व्यक्तीचा भारत देश सेंट्रल ओबेसिटीत मोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने शालेय स्तरावर ओबेसिटी अर्थात स्थुलत्व तपासणी मोहीम गतिमान केली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातही ती राबवली जाणार आहे.









