कुडाळ –
सिंधुदूर्ग जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा एनसीडी टीम व ग्रामीण रुग्णालय ( कुडाळ ) यांच्या सहयोगाने कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. तंबाखू मुक्त लाभार्थीना गुलाब व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमात 2024- 2025 या वर्षातील जे तंबाखू मुक्त (तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ सोडलेले ) झालेल्या लाभार्थीचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालय (कुडाळ ) चे वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय वाळके होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून एनसीडी ( कुडाळ )चे वैद्यकीय अधिकारी डॉ दिगंबर करंबेळकर , वैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश पन्हाळे व डॉ प्रवीण अढाव , फार्मसिस रमाकांत आंगणे तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि एस.एस. पी.एम. कॉलेज ( पडवे ) विद्यार्थी उपस्थित होते. डॉ वाळके यांनी तंबाखू किंवा तंबाखूजन्य कुठलाही पदार्थ सेवन करणे आपल्या शरीराला घातक आहे. तंबाखू पासून मुक्त झालेल्यांनी तंबाखू सोडणे आपल्यासाठी का हिताचे आहे.हे समाजाला पटवून सांगितले पाहिजे,असे सांगून तंबाखू मुक्तीसाठी सर्वांनी जनजागृती करणे गरजेचे आहे,असे सांगितले.डॉ करंबेळकर यांनी तंबाखूचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे आजार याची माहिती दिली.तंबाखूचे शरीराला हानिकारक असल्याने त्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी झाले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले. तसेच तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक गायत्री कुडाळकर यांनी केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांसाठी काय नियमावली आहे किंवा दंडात्मक कारवाई किती आहे याची माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एनसीडी स्टाफ नर्स माधुरी गावडे यांनी बी.पी.,शुगर तपासणी केली.तसेच या तपासणीच्या आधारे काहींची इसीजी तपासणीही त्यांनी केली.









