संतोष पाटील,कोल्हापूर
World Milk Day : कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुण्याचा काही भाग तसेच उत्तर कर्नाटक हा परिसर दर्जेदार आणि मुबलक म्हैस दुधासाठी प्रसिध्द आहे. एकट्या कोल्हापुरात घरगुती वापरांसह तब्बल 30 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. निखळ आणि विशिष्ट चव रंग असलेली कोल्हापुरातील ही दूध संस्कृती कायम राखण्याचे आव्हान आहे. 1 जून या जागतिक दूध दिनानिमित्त दूध व्यवसायाचा घेतलेल्या आढाव्यात शेतकऱ्याला ताजा पैसा हातात देणाऱ्या दूध व्यवसायाने आर्थिक उभारी तर दिलीच याशिवाय कोरोना महामारीत जगण्यासाठी हात दिल्याचे दिसून आले.
दुधाचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक दूध दिनाची 1 जून 2001 पासून सुरू केली. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये भारताचे दूध उत्पादन 21 कोटी टन झाले आहे. जे 2015-16 मध्ये 155 कोटी टन होते. या कालावधित कर्नाटकचे दूध उत्पादन 72.39 टक्क्यांनी वाढले आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये 2020-21 मध्ये झालेल्या 3 कोटी टन उत्पादनासह उत्तर प्रदेश अव्वलस्थानी राहिला असला तरी, 2019-20 च्या तुलनेत उत्पादनात 1.58 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या कालावधित उत्तर प्रदेशचे दूध उत्पादन 18.84 टक्क्यांनी वाढले आहे. 2015-18 वगळता गेल्या सहा वर्षात केरळमध्ये उत्पादनात घट झाली असून उत्पादनातील एकूण घट 1.15 लाख टन होती. तर आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीम या राज्यांमध्ये 2009-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये उत्पादनात घट झाली आहे. जगाच्या दुधाच्या उत्पादनात भारताचा वाटा 23 टक्के आहे. अमेरिकेचा 11 टक्के, सात टक्के दूध उत्पादनासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात सध्या माणसी दूध उपलब्धता 345 ग्रॅम असून 2050 पर्यंत ही उपलब्धता 800 ग्रॅम इतकी होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये दूधाची संस्कृती पुनर्जिवित करण्याची आवश्यकता आहे. कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, हाडांची मजबूती, दातांची मजबूती, तसेच निरनिराळ्या तऱ्हेची व्हिटॅमिन्स मिळतात. कॅल्शिअममुळे शरीरातील हाडांचा ऱ्हास होत नाही. तसेच डोकेदुखी, मुलांमधील लठ्ठपणा आणि अनावश्यक ताण कमी करण्यामध्ये कॅल्शिअम कामी येते. शरीराला कॅल्शिअम कमी मिळाल्यास मोठ्या रोगांना आमंत्रण मिळते. व्हिटॅमिन डी मुळे शरीरातील कॅल्शिअम हे शरीरात राहाते. दुधाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते. व्हिटॅमिन ए,डी,ई,के हे दूधातील फॅटमध्ये विरघळलेल्या स्वरूपात असतात तसेच दुधामध्ये निरनिराळी खनिजे जशी की, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सिलेनियम आणि झिंक असतात. ही खनिजे सर्वसाधारणपणे दुधातील प्रोटीनमध्ये विरघळलेल्या स्वरूपात असतात. साधारणपणे दूध गोड, गुळगुळीत, ओज व रस वाढवणारे, पित्त कमी करणारे, वीर्य, कफ वाढवणारे, जड व शीतल असते. आयुर्वेदातील आचार्यांनी मुख्यत: आठ प्रकारचे दूध सांगितले आहे.