डॉ. अनिल काकोडकर संमेलनाध्यक्ष, डॉ. प्रमोद सावंत स्वागताध्यक्ष : मराठी भाषेला ऊर्जा देण्याचे कार्य करणार
पणजी : गोव्यात येत्या 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी जागतिक मराठी अकादमीचे 21 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन उत्साहात रंगणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर भूषवणार असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वागताध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व नामवंत साहित्यिक रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, बिल्वदल परिवाराचे अध्यक्ष तथा ‘तरुण भारत’चे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब व जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील उपस्थित होते. संमेलनाचे आयोजन गोवा मराठी अकादमी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, बिल्वदल परिवार तसेच इतर मराठी संस्थांच्या सहयोगाने होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी, 9 जानेवारी रोजी, जागतिक मराठी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे फुटाणे यांनी सांगितले.
या अगोदर गोव्यात पहिले संमेलन जानेवारी 2008 मध्ये झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष निळू फुले तर स्वागताध्यक्ष दिगंबर कामत होते. या संमेलनाचा आवाका केवळ साहित्यापुरता मर्यादित न ठेवता, कला, उद्योग, विज्ञान, शिक्षण आदी विविध क्षेत्रात मानाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींशी संवाद ठेवण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे. त्यांच्या जीवनप्रवासाच्या मुलाखतींमुळे तऊण पिढीला दिशा व प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, मराठी-कोकणी साहित्य या विषयांवरील सत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक मराठी परिषदेच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या जागतिक मराठी अकादमीच्या कार्याची माहिती देताना फुटाणे म्हणाले की, माधव गडकरी यांनी 2002 साली अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यापासून मी सातत्याने ही धुरा वाहत आहे. जगभरातील अनेक देशांत मराठीबांधव स्थायिक झाले आहेत. त्यांना या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येईल. जागतिक पातळीवरील मराठी प्रेमी एकत्र आणणे हाच या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. या पत्रकार परिषदेत आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब यांनी प्रास्ताविक केले.
मराठी भाषेला नवचैतन्य लाभेल
गोव्यात दुसऱ्यांदा होत असलेल्या या संमेलनामुळे मराठी भाषेला नवचैतन्य मिळणार आहे. मराठीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि या संमेलनातून त्यांना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मराठी भाषेला ऊर्जा देण्याबरोबरच तऊण वर्गाला दिशा व प्रेरणा देण्याचे कार्यही या संमेलनातून घडणार आहे.
-प्रा. अनिल सामंत
नवी ऊर्जा लाभेल
या संमेलनामुळे गोमंतकातील नवोदित साहित्यिकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या संमेलनाचा मोठा लाभ होईल. गोमंतकीय कलाकार, लेखक आणि कवींना नवी ऊर्जा देण्याचे कार्य या संमेलनातून घडेल.
-रमेश वंसकर
असे संमेलन होणे भाग्याची गोष्ट
हे संमेलन खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील मराठीप्रेमींना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरणार आहे. गोव्यातील जे दिग्गज विविध क्षेत्रांत देश-विदेशात लौकिक मिळवत आहेत, त्यांनाही आपली भूमिका मांडण्याची संधी यातून मिळणार आहे. गोव्यात असे संमेलन होणे ही भाग्याची गोष्ट असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
-सागर जावडेकर









