जी-20 च्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिखर परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी जी-20 आणि अतिथी देशांचे नेते राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राजघाटावर पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांचे खादीची शाल घालून स्वागत केले. तसेच राजघाटाची माहितीही सर्व नेत्यांना देण्यात आली.
शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जी-20चे नेते आणि शिष्टमंडळ प्रमुखांचे स्वागत केले. सर्व जागतिक नेत्यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. नवीन वर्षात आता जी-20ची सूत्रे ब्राझील स्विकारणार असून राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी महात्मा गांधींबद्दल मौलिक विचार व्यक्त केले. आज महात्मा गांधींना आदरांजली वाहताना मी खूप भावूक झालो. माझ्या राजकीय जीवनात महात्मा गांधींचे किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे, असे त्यांनी नमूद केले.
राजघाटावर नेतेमंडळींची रीघ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह सर्वच नेत्यांनी राजघाटावर भेट देत महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे राजघाटावर स्वागत केले. पंतप्रधान झाल्यानंतर सुनक पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले असून त्यांची राजघाटावरील ही पहिलीच भेट होती. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, रशियाचे परराष्ट्र मंत्री लव्हरोव, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आदी नेतेही बापूंना श्र्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. स्पेनचे राष्ट्राध्यक्ष कोरोनामुळे शिखर परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या जागी उपराष्ट्रपती नादिया सांतामारिया भारतात आल्या असून त्यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.









