घरच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरीसाठी दमदार भारत सज्ज
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी यजमान भारत सज्ज झाला आहे. उन्नती हुडा व रक्षिता श्रीसारख्या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीने आणि कनिष्ठ गटातील विद्यमान तसेच माजी जागतिक स्तरावरील अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंच्या सहभागाने संघाला बळकटी मिळाली आहे.
जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा 17 वर्षांच्या अंतरानंतर भारतात परतली आहे आणि 6 ते 19 ऑक्टोबरदरम्यान दोन टप्प्यात ती आयोजित केली जाईल. पहिल्या टप्प्यात 36 संघ मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिष्ठित सुहंदिनाता कपसाठी स्पर्धा करतील. त्यानंतर आय-लेव्हल कपसाठी वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा होईल. भारताने आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 11 वैयक्तिक पदके जिंकली आहेत, ज्यात 2008 च्या पुण्यातील कामगिरीचा समावेश आहे. पुण्यात त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले होते. सध्याच्या भारतीय पथकाकडे यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करण्याची आणि मिश्र सांघिक स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे. मिश्र गटात संघाच्या ताकदीमुळे यजमानांना स्पर्धेत दुसरे मानांकन मिळण्यास मदत झाली आहे.
गट ‘एच’मध्ये यूएई, श्रीलंका आणि नेपाळसह असलेला भारत गटात अव्वल स्थान मिळविण्यासाठी पसंतीचा संघ आणि पदकाचा मजबूत दावेदार आहे. नव्याने सादर करण्यात आलेली ‘बेस्ट-ऑफ-थ्री सेट रिले-स्कोअरिंग’ पद्धत येथे लागू असून त्यात प्रत्येक सेटमध्ये 45 गुणांपर्यंत मजल मारली जाईल. भारत आज सोमवारी नेपाळविऊद्ध आपली मोहीम सुरू करेल, त्यानंतर मंगळवारी श्रीलंका आणि बुधवारी यूएईविऊद्ध सामने होतील.
बाद टप्प्यात भारताचा सामना माजी विजेत्या दक्षिण कोरियाशी होण्याची शक्यता आहे, जे गट ‘जी’मध्ये अव्वल स्थान मिळवण्याची अपेक्षा आहे आणि त्यांच्याविऊद्ध विजय मिळवल्यास यजमानांना ऐतिहासिक पदक मिळेल. इतर प्रमुख पदक दावेदारांमध्ये 14 वेळचा विजेता चीन, बॅडमिंटन पॉवरहाऊस जपान, दक्षिण कोरिया, थायलंड आणि गतविजेता इंडोनेशिया यांचा समावेश आहे. इंडोनेशिया हा फॉर्ममध्ये असलेला संघ आहे, कारण त्यांनी फेब्रुवारीमध्ये चीनला हरवून आशियाई मिश्र सांघिक किताब जिंकला होता.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांच्या आशा प्रामुख्याने मुलींच्या एकेरीवर अवलंबून असतील, ज्यामध्ये आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेतील कांस्यपदक विजेती तन्वी शर्मा, जी कनिष्ठ गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे, वेन्नाला के, चायना ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलेली उन्नती आणि रक्षिता यांचा समावेश आहे. मुलांच्या एकेरीत भारताच्या आशा मुख्यत: जागतिक क्रमवारीत 14 व्या क्रमांकावर असलेला रौनक चोहान आणि 17 वर्षीय ज्ञाना दत्तू टीटी यांच्यावर असतील.









