World Heritage Week : सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
इ.स. 1877 ला पंचगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असताना टेकडीवरील बाजूला अनेक प्राचीन वस्तू सापडल्याची नोंद आहे.नोव्हेंबर इ.स.1944 मध्ये ब्रह्मपुरी टेकडीवरील संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण उत्खननास सुरुवात झाली. भूगर्भाच्या 9 व्या थरापर्यंत उत्खनन झाले.ज्या थरापैकी प्रत्येक थरात सापडणाऱ्या दुर्मिळ वस्तू या कोल्हापूर शहराचा इतिहास इ.स. 200 पूर्व म्हणजेच 2000 वर्षे मागे घेऊन गेला. प्रत्यक्षात जो इतिहास उलगडला त्याचे महत्त्वपूर्ण साक्षीदार आपणास या वस्तूसंग्रहालयात पुरातत्त्व दालन या विभागात आजही पाहावयास मिळतात.
इ.स. 200 पूर्व ते इ.स. 200 या कालावधीतील सातवाहन कालीन वसाहतीवर अभ्यासकांचे शिक्कामोर्तब झाले.वैशिष्ट्यपूर्ण वसाहतीचे तत्कालीन राहणीमान,व्यवस्था,मातीची भांडी,खापराचे तुकडे,घरे यासह इतर गोष्टींचा महत्त्वपूर्ण अभ्यास झाला.या दालनातील प्रत्येक वस्तू कोल्हापूरचे प्राचीनत्व निदर्शक असून त्या वस्तू प्राचीन स्थापत्य,मूर्ती विज्ञान इत्यादीच्या अभ्यासास उपयुक्त आहेत.
पहिल्या दुसऱ्या शतकात रोमराज्यांशी असणारे कोल्हापूरचे व्यापारी संबंध स्पष्ट करणाऱया वस्तू या उत्खननातील थरात आढळल्या.समुद्रदेवता,ब्रांझची भांडी,रोमन पुतळ्या,काच सामान,यासह 11 व्या शतकातील दगड, कळस, तीन शिवलिंग,सोन्याच्या मुलामासहमणी,पेन्सील अशा विविध वस्तू येथे आहेत.
अधिक वाचण्यासाठी- दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
ग्रीक वसाहतीजवळ सोकोना बेटावर बरेच भारतीय लोक राहत होते.त्यापैकीच कुणीतरी उत्खननातील ग्रीक पुराणातील समुद्र देवतेची मूर्ती आणली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.याच पुतळ्यावरून आद्य राज्यकर्ते सातवाहन काळातील असून त्यांचे युरोपातील रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट होते.
येथील ब्रांझ धातूमधील 5 सेमी उंच व 5.5 सेमी लांब हत्तीवर स्वार झालेल्या तीन स्त्रिया व एक पुरुष व्यक्ती ही सुबक व कलात्मक वैशिष्टय़पूर्ण कलाकृती सातवाहन काळातीलच असून तत्कालीन त्यावरील आभूषणे, पोशाख, हे तत्कालीन राजवैभवच समोर उभे करते.
अधिक वाचण्यासाठी- World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
पंचरशी धातूंच्या दोन बैलगाडय़ा,घंटा,करंडा छत्रीचे नक्षीदार दांडे,तसेच मातीच्या विविध वस्तू व भाजलेल्या मातीच्या भांडय़ांवरील नक्षीकाम अशा दुर्मिळ प्राचीन वस्तू आहेत.रोमन व भारतीय बनावटीचे आरसे देखील आहेत. अभ्यासकांच्या मते यातील एक आरसा प्राचीन भारतातील शुंग कुशाणकाळापासून अष्टमांगलिक शुभ प्रतिकांपैकी एक असल्याचे मानले जाते.दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहासाचा जिवंत साक्षीदार आपल्याच शहरातील या संग्रहालयात ताट मानेने आजही उभा आहे त्याला प्रत्यक्ष भेटीतून उजाळा देणे ही आपलीच जबाबदारी आहे.
रोमन पदक (सील)
पर्सियस हा अँड्रोमेडेला हिला समुद्री राक्षसापासून वाचवितो व नंतर ते लग्नग्न करतात अशी ग्रीक कथा आहे. या दोघांची एकत्र चित्रे व नाणी बऱयाच देशात पहावयास मिळतात. कोल्हापूर वस्तुसंग्रहालयातील हे सील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापूर व ग्रीक रोमन यांचे संबंध अधोरेखित होतातच. मौल्यवान संपत्ती (खजिना) असलेल्या पेटय़ांवर अशी सील लावण्याची पद्धत होती.
इंद्रनील बंकापुरे, भारतीय प्राच्यविद्या अभ्यासक, कोल्हापूर
Previous Articleयोगबद्दल जागृती करण्यात पतंजली योगपीठचे योगदान मोठे
Next Article यापुढे किनारपट्टी परिसरात बांधकामांना परवानगी नको









