रत्नागिरी :
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक व निरोगी आयुष्यातून आशादायक भविष्य निर्माण करण्यासाठी तसेच सर्वांचे क्षेमकुशल साध्य करण्यासाठी शासन अविरत कार्य करत आहे. सन 2025 वर्षासाठी निरोगी आयुष्यातून आशादायक भविष्य या विषयाला अनुसरून आज 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. या दिनापासून जिल्ह्dयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये वर्षभर जनजागृतीचे कार्यक्रमांचे नियोजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, आरोग्य विमा योजना, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंदिर/देवस्थान वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच इतर सेवाभावी संस्थाच्या वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती, अर्ज करण्याची पद्धत, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अर्ज कोणाकडे सादर करावयाचा आदीबाबत सविस्तर माहिती गावागावात पोहचवून जनजागृती करणे, गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसुतीनंतरच्या कालावधीशी संबंधित उपयुक्त आरोग्य माहिती महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष गृहभेटी देऊन जनजागृती करणे, जिल्हा तसेच तालुकास्तरावर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांचा विनामूल्य अधिकाधिक सहभाग घेणे यांचा समावेश आहे.








