प्रतिनिधी,सुधाकर काशीद
World Family Day : अलीकडे लग्न ठरवताना मुलींची अपेक्षा काही वेगळीच असते.अशा घरातील स्थळाला मुलींची अधिक पसंती असते.म्हणजेच काय तर,आम्ही दोघे राजाराणी,किंवा हम दो हमारे दो असे राहणीमान मुलींना हवे असते.असे राहणे काळाच्या ओघात किती बरोबर ?किती चूक? हा वेगळा विषय आहे.पण करवीर तालुक्यात वरणगे पाडळी गावातील शिंदे परिवारात आज ही 38 जण एकत्रित राहत आहेत.एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय याचे चालते बोलते ते एक उदाहरण आहे.
आज जागतिक कुटुंब दिन आहे.कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगणारा आजचा दिवस आहे.किंबहुना धावपळीच्या या युगात कुटुंबीय व्यवस्था विभक्त होत आहे.नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने होणाऱ्या बदलात ही विभक्तता टाळणेही तसे अशक्य आहे.त्यामुळे एका कुटुंबातच छोटी छोटी वेगळी कुटुंबे तयार झाली आहेत.आणि एका कुटुंबात एकत्रित तब्बल 38 जण आजही राहतात म्हणजे तो एक औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
वरणगे पाडळी हे गाव प्रयाग चिखली च्या पुढे आहे.गाव नदी काठावर.त्यामुळे हिरव्यागार शेतीने समृद्ध आहे.त्या गावात बापूसाहेब पांडुरंग शिंदे यांचा परिवार आहे. या बापूसाहेबांचे वय आज 93 आहे.त्यांना पाच भाऊ दोन बहिणी.पाच भावांचे विवाह झाले.आणि हळूहळू हा परिवार वाढू लागला.काही जणांना असे एकत्रित राहणे अडचणीचे वाटते.पण या परिवारातील सर्वांनी एकत्रित कुटुंबाचे बळ ओळखले.आणि प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवला तर कुटुंबाच्या पायाला अधिक भक्कमता कशी येते हे आपल्या एकत्र कुटुंबातून दाखवून दिले.
या कुटुंबात 38 जण.मग हे राहतात कसे?जेवण बनवतात कसे?घरातल्या खर्चाचे नियोजन करतात कसे?सणवार मुलांचे शिक्षण,लग्न सोहळे,आजारपण व दैनंदिन घरगुती कामाच्या जोडण्या लावतात कसे?हा खरोखर औत्सुक्याचा विषय.कारण आता चार माणसाच्या घरात एकाच दुसरा दिवस एखादा पाहुणा आला तरी त्या घराचे वेळापत्रक बिघडते.मग हे शिंदे परिवाराचे 38 जण एकत्र राहतात तरी कसे….

या घरातले सकाळी 38 व संध्याकाळी 38 जणां चे जेवण,दोन वेळचा चहा नाश्ता इतर खाणीपिणे म्हणजे मोठा व्याप.रोज एका वेळी पन्नास भाक्रया भाजल्या जातात. दोनशे चपात्या लाटल्या जातात.भाताला कुकर नव्हे तर जरमलचे पातेलेच चुलीवर ठेवतात.दर रविवारी या परिवारात मटण ठरलेले असते.त्यासाठी पाच किलो मटण आणावेच लागते.घरातल्या महिलांनी जेवण चहा, नाश्ता, धुणी, भांडी याची जबाबदारी वाटून घेतली आहे.त्यासाठी कोठे नियमाचे पुस्तक नाही.पण आपसातील समजूतदारपणा खूप मोलाचा ठरला आहे.
घरात अडतीस माणसे.त्यामुळे महिन्यात एक दोघांचा वाढदिवस येतो.आणि घरात गोड धोडाचा थाटही उडतो.या घरातील बापूसाहेब शिंदे यांचे वय आज 93 आहे. घरात जबाबदार माणूस म्हणून त्यांचे एक वेगळे स्थान आहे.आजही त्यांना विचारूनच सारे महत्वाचे निर्णय घ्यायचे हे ठरूनच गेले आहे.घरात कोणी आपल्या मनाप्रमाणे काहीही करावे असला प्रकार खूप क्वचित आहे.
घरातला सर्व बाजार आठवड्याला भरला जातो.शेती चाळीस एकर असल्याने धान्य तेल डाळी घरच्याच आहेत.इतर घरगुती साहित्य मात्र पोत्याने आणावे लागते. घरात एवढे लोक,त्यातील लहान मुले त्यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवले जाते. शिक्षण घेण्राया मुलांना रोज अभ्यासाला बसावेच लागते.घरातले एकजुटीचे वातावरण जपायचेच आहे ही शिकवण मुलांना लहानपणापासून दिली जाते.त्यामुळे 38 जणांनी भरलेला हा परिवार केवळ घर नव्हे तर,एक आनंदाचा निवारा असे त्याचे स्थान आहे.
अलिखीत नियम…
ठघरातल्या पुरुषांच्या चर्चेत बायकांनी आणि बायकांच्या चर्चेत पुरुषांनी लक्ष घालायचे नाहीठ हा या घरचा अलिखित नियम आहे.शेतीमुळे घरात ऐश्वर्य आहे पण समजूतदारपणामुळे एकत्र कुटुंब अधिक भक्कम कसे होऊ शकते याचे हे उदाहरण आहे.या एकजुटीचे बळ या कुटुंबाला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच मिळते. या कुटुंबातील कोण ना कोण या निवडणुकीत निवडून येतोच.संदीप शिंदे हे सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत.









