वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेचे यजमानपद तामिळनाडूची राजधानी चेन्नई भूषविणार आहे. सदर स्पर्धा 13 ते 17 जून दरम्यान चेन्नईत खेळवली जाणार असून यामध्ये जागतिक दर्जाचे विविध देशांचे पुरुष आणि महिला स्क्वॅशपटू सहभागी होणार आहेत.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे स्क्वॅशपटू सौरभ घोषाल आणि ज्योत्स्ना चिन्नाप्पा यांच्या कामगिरीवर यजमान देशाचे यश अवलंबून राहिल. विश्व स्क्वॅश फेडरेशन आणि तामिळनाडू क्रीडा विकास अॅथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा एक्स्प्रेस अॅव्हेन्यू मॉल आणि द इंडियन स्क्वॅश-ट्रायथलॉन अकादमी येथे होणार आहे. सोमवारी ही अधिकृत घोषणा करण्यात आली. यापूर्वी म्हणजे 2011 ची विश्वचषक स्क्वॅश स्पर्धा चेन्नईमध्ये झाली होती. तामिळनाडू शासनातर्फे ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे.
चेन्नईतील होणारी ही स्पर्धा चौथी विश्वचषक स्क्वॅश स्पर्धा आहे. 2011 च्या तुलनेत या वेळच्या स्पर्धेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. स्क्वॅशपटूंच्या नव्या पिढीला अधिक प्रोत्साहनात्मक होईल यासाठी भारतातील क्रीडा विकास आणि शौकीन यांचे योगदान यावेळी महत्त्वाचे ठरणार आहे. विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच चेन्नईत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक सामने पाच गेम्सचे तसेच सात गुणांपर्यंत खेळवले जातील. प्रत्येक संघामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला स्क्वॅशपटूंचा समावेश राहिल. सदर स्पर्धा परस्पराविरुद्ध 4 सामने खेळतील. 2023 च्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेत एकूण 8 देशांचा समावेश असून त्यामध्ये यजमान भारत, हाँगकाँग, चीन, जपान, मलेशिया, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कोलंबिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेत इजिप्तला टॉप सिडींग मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सौरभ घोषाल तसेच ज्योत्स्ना चिन्नाप्पा करणार आहेत. भारतीय संघामध्ये सौरभ घोषाल, अभयसिंग, ज्योत्स्ना चिन्नाप्पा आणि तन्वी खन्ना यांचा समावेश आहे.









