सलग तीन सामन्यात पाच बळी घेणारा पहिला फिरकीपटू : लंकेचा आयर्लंडवर 133 धावांनी विजय
वृत्तसंस्था /हरारे
आयसीसी वनडे विश्वचषक क्वालिफायर फेरीतील 15 वा सामना रविवारी श्रीलंका विरुद्ध आयर्लंड संघात पार पडला. हा सामना श्रीलंका संघाने तब्बल 133 धावांनी जिंकला. सामना जिंकण्यासोबतच श्रीलंकेचा प्रतिभावान फिरकीपटू वनिंदू हसरंगा यानेही धारदार गोलंदाजीच्या जोरावर खास विक्रम नावावर केला. तो अशी कामगिरी करणारा जगातील दुसराच गोलंदाज बनला. या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 325 धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघाचा डाव 31 षटकात 192 धावांवरच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 133 धावांनी खिशात घातला. आयर्लंडच्या 10 पैकी 5 विकेट्स या एकट्या वनिंदू हसरंगाने घेतल्या होत्या. अशी कामगिरी करताच त्याने अनोखा विक्रम नावावर नोंदवला.
वनिंदू हसरंगाने सलग तिसऱ्या सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात पाच विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, हसरंगा हा तीन सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा जगातील पहिलाच फिरकीपटू आहे. ही कामगिरी करताच त्याने पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनूस याची बरोबरी केली आहे. त्याच्या नावावर सलग तीन वनडेत पाच विकेट्स घेण्याचा विक्रम होता. वकार युनूसने 33 वर्षापूर्वी अशी कामगिरी केली होती. हसरंगाने श्रीलंकेकडून आतापर्यंत 4 कसोटी, 43 वनडे आणि 58 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 4 बळी घेतले असून वनडेत 4.95 च्या इकॉनॉमी रेटने 56 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त टी 20 मध्ये त्याने 91 विकेट्स घेतल्या आहेत.
झिम्बाब्वेचा अमेरिकेवर 304 धावांनी दणदणीत विजय
विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना अमेरिकेचा 304 धावांनी धुव्वा उडवला. पात्रता फेरीतील झिम्बाब्वेचा हा सलग चौथा विजय असून त्यांचे चार सामन्यात आठ गुण झाले आहेत. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेची ही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय, झिम्बाब्वेचा हा वनडेमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंद भारताच्या नावावर असून याचवर्षी भारताने श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता. पात्रता फेरीत झिम्बाब्वेने अमेरिकेविरुद्ध ही शानदार कामगिरी करताना हा अनोखा विक्रम नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 50 षटकांत 6 बाद 408 धावा जमवल्या. कर्णधार सीन विल्यम्सने सर्वाधिक 101 चेंडूत 21 चौकार व 5 षटकारासह 174 धावा फटकावल्या. विल्यम्सची ही वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी त्याची सर्वोच्च धावसंख्या 129 होती. याशिवाय, जॉयलॉर्ड गुंबीने 78, सिकंदर रजाने 48 तर रेयान बर्लने 47 धावांचे योगदान दिले. यानंतर विजयासाठीच्या 409 धावांचे बलाढ्या लक्ष्य अमेरिकेला पेलवले नाही. त्यांचा डाव 25.1 षटकांत 104 धावांवर आटोपला. अमेरिकेच्या केवळ तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा, रिचर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









