क्रिकेटवेड्या देशातील, फुटबॉलवेडे कोल्हापूर ; मेस्सी, नेमार, रोनाल्डोच्या 10 व 7 नंबर जर्सीला सर्वाधिक मागणी; अर्जेंटिना, पोर्तुगाल, ब्राझीलचे झेंडेही फडकले; स्पर्धा कतारमध्ये, जल्लोष व ईर्ष्या कोल्हापुरात
इम्रान गवंडी : कोल्हापूर
मी मेस्सीचा फॅन, मला नेमारच आवडतो, रोनाल्डोशिवाय पर्याय नाही… अशी चर्चा करणारे कोल्हापुरात लाखो आबालवृद्ध फुटबॉलवेडे आहेत. म्हणूनच कोल्हापूरला ‘क्रिकेटवेडय़ा देशात, फुटबॉलवेडे शहर’ म्हणून ओळखले जाते, अन् या इमेजला उंचावणारी हिस्ट्री घडलीय. फिफा वर्ल्डकप फिव्हरमध्ये शहरात 5 हजारांहून अधिक टी शर्टची विक्री झालीय. यामध्ये 10 अन 7 नंबरच्या जर्सींची संख्या सर्वाधिक आहे. म्हणूनच कोल्हापूर अन् फुटबॉलचं नातं देशभर चर्चेत आहे.
कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप सुरू झाल्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत शहरात तब्बल 5 हजार जर्सींची उलाढाल झाली आहे. यामध्ये अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी ( Messi) ब्राझीलच्या नेमार (Nemar), पोर्तुगालच्या रोनाल्डोच्या (Ronaldo) जर्सींची सर्वाधिक विक्री झाली आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धा कतारमध्ये (FIFA World Cup ) सुरु आहेत. पण त्याचा जल्लोष अन् इर्ष्या फुटबॉलवेडय़ा कोल्हापुरात पहायला मिळत आहे.
यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात अर्जेंटिना अन् फ्रान्सने धडक मारली आहे. अर्जेटिना संघातील नामवंत खेळाडू दिवंगत दिएगो मॅरोडोनानंतर नाव येते ते लियोनेल मेस्सीचे. सध्या, मेस्सी फुल्ल फॉर्ममध्ये आहे. कोल्हापुरातील फुटबॉल शौकीनांची मेस्सीला अधिक पसंती आहे. विक्री झालेल्या 5 हजार जर्सीमध्ये सर्वाधिक 2 हजार जर्सी या मेस्सीचा लकी असलेल्या 10 नंबरच्या आहेत. मेस्सी पाठोपाठ पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, ब्राझीलचा नेमारसह फ्रान्स, बेल्जिअम, क्रोएशिया, पोलंड संघांतील खेळाडूंचे लाखो फॅन्स आहेत. फुटबॉल विश्वचषकमध्ये अर्जेटिना, ब्राझील व पोर्तुगाल संघाला शौकीनांची पसंती आहे.
फुटबॉल फिव्हर अन् खेळाडूंची क्रेझ…
शहरासह जिल्हय़ात मेस्सी, रोनाल्डो, नेमारचे लाखो फॅन्स आहेत. तरुणाईत त्यांची क्रेझ आहे. अनेक चाहत्यांनी आवडत्या खेळाडूच्या हेअर स्टाईल केली आहे.
10 व 7 नंबरच्या जर्सीला सर्वाधिक मागणी
आत्तापर्यंत विक्री झालेल्या जर्सींमध्ये मेस्सीच्या 10 नंबरच्या दोन हजार जर्सींनंतर मेस्सी, नेयमारंच्या 10 नंबर जर्सी आहेत. रोनाल्डोंच्या 7 नंबर जर्सीला अधिक मागणी आहे. त्या जर्सी 600 रुपयांना तर इतर जर्सी 400 रुपयांना आहेत. 10 व 7 नंबरच्या जर्सीला मागणी असल्याचे विक्रेते अरूण पाटील यांनी सांगितले.
मेस्सीला सर्वाधिक पसंतीचे कारण मेस्सीचा जादुई पास
मेस्सीने यंदाच्या विश्वचषकातील 6 सामन्यांत 5 गोल केले. त्याने दिलेल्या अचूक पासवर संघाने 3 गोल केले आहेत. विश्वचषक जिंकण्याचे वर्षानुवर्षे जोपासलेले स्वप्न पूर्ण करण्यापासून लियोनेल मेस्सी एकच पाऊल दूर आहे. टीमसाठी गोल करण्यामध्ये मेस्सीच्या जादुई पासचे योगदान महत्वाचे ठरत असल्याचे चाहते सांगतात.