वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
2026 साली होणाऱ्या फिफाच्या पुरुषांच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ 5 डिसेंबर रोजी वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटर येथे काढण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
2026 मध्ये होणारी फिफाची विश्व चषक फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदाच तीन देशांच्या यजमानपदाने भूषविली जाणार आहे. या स्पर्धेचे अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सीको हे तीन देश यजमान आहेत. सदर स्पर्धा 11 जून ते 19 जुलै 2026 मध्ये होणार असून या स्पर्धेत 48 संघांचा समावेश राहील. या स्पर्धेतील सामने 16 ठिकाणी भरविले जाणार आहेत. त्यानुसार अमेरिकेत 11 ठिकाणी, मॅक्सीकोत तीन ठिकाणी आणि कॅनडात दोन ठिकाणी हे सामने भरविले जातील. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अमेरिकेतील सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, लॉस एजिंल्स, डल्लास, सॅन फ्रँसिस्को, मियामी, अॅटलांटा, सिटेली, होस्टन, फिलाडेलफिया, कॅनास सिटी, बोस्टन या शहरांतील अद्यावत फुटबॉल स्टेडियमध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. 2026 च्या फिफाच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणारे 48 संघ 12 गटात विभागण्यात येतील. प्रत्येक गटामध्ये चार संघांचा समावेश राहील. या स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन यजमान देशांसह 10 देशांनी आपली पात्रता सिद्ध केली असून त्यामध्ये जपान, न्यूझीलंड, इराण, अर्जेंटिना, उझबेकिस्तान, द. कोरिया, जॉर्डन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इक्वेडोर यांचा समावेश आहे.









