आता अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनशी मुकाबला, दिग्गज बुद्धिबळपटूंकडून कौतुक
वृत्तसंस्था/ बाकू (अझरबैजान)
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ‘टायब्रेकर’द्वारे जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो काऊआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला. दोन गेम्सची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपल्यानंतर या 18 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटूने आपल्यापेक्षा बऱ्याच वरच्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन ग्रँडमास्टरला चुरशीच्या टायब्रेकरमधील बुद्धीच्या लढाईत मागे टाकले. प्रज्ञानंदची आता अंतिम फेरीत नॉर्वेचा दिग्गज खेळाडू मॅग्नस कार्लसनशी लढत होईल. मंगळवारी दोघांतील पहिला डाव अनिर्णीत राहिला होता.
प्रज्ञानंदने गुऊवारी आपला देशबांधव अर्जुन एरिगाईसीचा ‘सडन डेथ टायब्रेकर’मध्ये 5-4 असा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. त्याने पुढच्या वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतही आधीच स्थान पक्के केले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची कामगिरी 2002 मध्ये विश्वनाथन आनंदने केली होती. पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या आनंदनंतर हा टप्पा गाठणारा प्रज्ञानंद पहिला भारतीय बनला आहे.
‘प्राग अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो काऊआनाचा पराभव केला आणि आता मॅग्नस कार्लसनशी त्याचा सामना होईल. काय कामगिरी आहे, असे बुद्धिबळातील दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंदने आपली प्रतिक्रिया पोस्ट करताना म्हटले आहे.
कास्पारोव्हकडून कौतुक

आर. प्रज्ञानंदच्या अतुलनीय घोडदौडीने दिग्गज गॅरी कास्पारोव्हला बुद्धिबळात जेव्हा तो राज्य गाजवायचा त्या काळाची आठवण करून दिली आहे. प्रज्ञानंदने मिळविलेल्या सनसनाटी विजयाने प्रभावित होऊन माजी जगज्जेत्या कास्पारोव्हने 18 वर्षांच्या या बुद्धिबळपटूच्या पराक्रमाचे आणि त्याच्या आईच्या प्रयत्नांचे ‘एक्स’वर जाऊन (पूर्वीचे ट्विटर) कौतुक केले. ‘प्रज्ञानंद आणि त्याच्या आईचे अभिनंदन. त्याची आई प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी सोबत असते. तो एक विशेष प्रकारचा आधार असतो. चेन्नईच्या या खेळाडूने न्यूयॉर्कच्या दोन काउबॉयजचा पराभव केलेला आहे. तो कठीण परिस्थितीतही खूप खंबीर दिसला’, असे कास्पारोव्हने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आर. प्रज्ञानंदच्या वाटचालीत खोलीच्या एका कोपऱ्यात उभे राहून त्याची बुद्धिबळ पटावरील लढाई पाहण्यात मग्न होणाऱ्या आई आर. नागलक्ष्मी आणि त्यांच्या डोळ्यातील चमक हे एक वैशिष्ट्या राहिले आहे. ‘मी माझ्या पत्नीला श्रेय दिलेच पाहिजे, ती त्याच्यासोबत स्पर्धांमध्ये जाते आणि खूप पाठिंबा देते. ती (दोघांची) खूप काळजी घेते,” असे प्रज्ञानदंचे वडील रमेशबाबू यांनी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानावरून संवाद साधताना सांगितले आहे.
दबावाच्या परिस्थितीतही अखंडपणे बचाव करण्याची आर. प्रज्ञानंदची क्षमता आणि प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत दुवे त्वरित हेरण्याचे त्याचे कौशल्य ही जागतिक दर्जाच्या खेळाडूची वैशिष्ट्यो आहेत. त्याची सर्वांत मोठी ताकद म्हणजे अगदी दिग्गज खेळाडूंविरुद्धही वाईट परिस्थितीत आपल्या बाजूचे रक्षण करण्याची त्याची क्षमता. तो आत्मविश्वासाने चांगल्या परिस्थितीचे विजयात रूपांतर करू शकतो.
– ग्रँडमास्टर एम. श्याम सुंदर (राष्ट्रीय प्रशिक्षक)

‘प्रज्ञानंदने या विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी केली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी (अंतिम फेरीत) त्याला असलेल्या संधींबद्दल खूप आशावादी आहे. त्याने रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. निश्चितपणे ते खूप महत्वाचे आहे. त्याला माहीत आहे की, तो चांगला खेळत आहे. त्यामुळे त्याला सल्ला देण्यासारखे फारसे काही नाही. परंतु, आम्ही त्याच्या सुऊवातीच्या रणनीतीबद्दल थोडक्यात चर्चा करतो’
– आर. बी. रमेश (प्रशिक्षक)









