वृत्तसंस्था/ ताश्कंद
सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या पुरुषांच्या विश्व चॅम्पियनशिप मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्धे दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला केवळ एका कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
ताश्कंदमधील या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्थानाची ऑफर नसली तरी येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतीय मुष्टीयोद्ध्यांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची राहिल. आशियाई स्पर्धा ही 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्रतेची म्हणून राहिल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 13 ऐवजी सात वजन गट राहतील. 51, 57, 63.5, 71, 80, 92 आणि 92 किलो वरील गटामध्ये भारतीय मुष्टीयोद्धे सहभागी होत आहेत. 2019 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या अमित पांगलच्या गैरहजेरीत शिवा थापा 63.5 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. गेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा एकमेव मुष्टीयोद्धा आकाशकुमारने एकमेव कास्यपदक मिळवले होते. भारताच्या शिवा थापाने आतापर्यंत सहावेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदके मिळवली आहेत. तसेच त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. शिवा थापाची ही दुसरी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 104 देशांचे 640 मुष्टीयोद्धे सहभागी होत असून सुवर्णपदक विजेत्याला प्रत्येकी 2 लाख अमेरिकन डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 1 लाख डॉलर्स तर कास्यपदक दोन विजेत्यांना प्रत्येकी 50 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेवर प्रामुख्याने ब्रिटन, युक्रेन, झेक प्रजासत्ताक, कॅनडा, आयर्लंड, स्वीडन, पोलंड आणि न्यूझीलंड यांनी बहिष्कार टाकला आहे.
भारतीय संघ : गोविंद सहानी-48 किलो, दीपक घोरिया-51 किलो, सचिन सिवाच-54 किलो, मोहमद हुसामुद्दीन-57 किलो, वरिंदर सिंग-60 किलो, शिवा थापा-63.5 किलो, आकाश सांगवान-67 किलो, निशांत देव-71 किलो, सुमित कुंडू-75 किलो, आशिष चौधरी-80 किलो, हर्ष चौधरी-86 किलो, नवीनकुमार-92 किलो, नरिंदर बेरवाल-92 किलोवरील.









