वृत्तसंस्था/ लंडन
फिडे वर्ल्ड रॅपिड टीम चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय संघ बनल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘टीम एमजीडी1’ने आणखी एक दमदार कामगिरी करत ’ब्लिट्झ’ स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान निश्चित केले आणि दुहेरी सुवर्णपदकाच्या शर्यतीत स्थान मिळवले.
चार गटांमधून 16 संघ बाद फेरीत प्रवेश करत असताना ‘गट ड’मध्ये ‘टीम एमजीडी1’ने फक्त एक बरोबरी टीम हंगेरीविऊद्ध साधली आणि त्यांचे इतर सर्व सामने जिंकून दिवसाचा शेवट 23 गुणांवर केला. राउंड-रॉबिन गट टप्प्यात एकूण 53 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील आघाडीचे 4 संघ बाद फेरीत पोहोचले आहेत.
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी, पी. हरिकृष्ण, व्ही. प्रणव, लिओन ल्यूक मेंडोन्सा, स्टॅव्ह्रोला त्सोलाकिडो आणि अथर्व तायडे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने एकंदरित सहा विजय मिळविले असून ब्लिट्झमधील सर्व गटांमधील आघाडीच्या संघांपैकी कुणालाही इतके विजय मिळविता आलेले नाहीत. नॉर्वे बुद्धिबळात नुकताच मॅग्नस कार्लसनला पराभूत करणाऱ्या एरिगेसीने 13 सामन्यांमध्ये 11 गुण मिळविले आणि तो संघातील अव्वल कामगिरी करणारा खेळाडू राहिला. काझचेस हे ‘गट ड’मध्ये 22 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा बिगरव्यावसायिक खेळाडू इस्लाम आयतेनने 13 सामन्यांतून 12 गुणांसह सर्वांत मोठे योगदान दिले आहे.
पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद खेळत असलेल्या फ्रीडमनेही गट ‘ब’मध्ये 22 गुणांसह हेक्सामाइंडसोबत आघाडी घेत बाद फेरीत प्रवेश केला आहे. फ्रीडमला दहाव्या फेरीत थीम इंटरनॅशनल ट्रेडिंगकडून पराभव पत्करावा लागला, पण त्यामुळे बाद फेरीतील त्यांचे स्थान धोक्यात आले नाही. फ्रीडमचे ले क्वांग लीम आणि हायक मार्टिस्यान हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राहिले. त्यांनी नऊ सामन्यांतून 8.5 गुण मिळवले. हेक्सामाइंडने फ्रीडमविरुद्ध 1.5-4.5 असा एक सामना गमावला असला, तरी त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. ’ब्लिट्झ’ स्पर्धेत 1 लाख 90 हजार युरोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
बाद फेरीतील संघांमध्ये डब्ल्यूआर बुद्धिबळ संघ, माल्कम्स मेट्स, हेटमन जीकेएस काटोविस, जर्मनी अँड फ्रेंड्स, टीम एमजीडी1, जनरेशन एक्सवायझेडए, नाइट डान्स, हेक्सामाइंड बुद्धिबळ संघ, फ्रीडम, फिडे एमबी टीम, ऊकीज, काझचेस, उझबेकिस्तान, बॅरिस.केझेड, थीम इंटरनॅशनल ट्रेडिंग, अश्दोद एलिट बुद्धिबळ क्लब यांचा समावेश आहे.









