वृत्तसंस्था/ लंडन
‘टीम एमजीडी1’, ज्यामध्ये प्रामुख्याने भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, त्यांनी फ्रीडम संघाला हरवून फिडे वर्ल्ड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिपमध्ये पाचवे स्थान पटकावले. येथे झालेल्या स्पर्धेत प्रतिष्ठित ‘रॅपिड’ विजेतेपद जिंकल्यानंतर काही दिवसांतच त्यांची ही कामगिरी घडली आहे.
2023 मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनचा दुसरा ब्लिट्झ मुकुट मिळविताना डब्ल्यूआर चेस संघाने काझचेसवर मात केली. ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीच्या नेतृत्वाखालील ‘टीम एमजीडी1’ने यापूर्वी 16 संघांच्या बाद फेरीत स्थान मिळवले होते आणि पहिल्या फेरीत जनरेशन एक्सवायझेडएला 4-0 असे हरवले होते.
परंतु एरिगेसी, पी. हरिकृष्ण, डेव्हिड गुइजारो, व्ही. प्रणव, लिओन ल्यूक मेंडोन्सा, स्टॅव्हरोला त्सोलाकिडो आणि अथर्व तायडे यांचा समावेश असलेल्या संघाला हेक्सामाईंड चेस संघाकडून क्वार्टरफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. हेक्सामाईंड संघात अमेरिकन ग्रँडमास्टर लेव्हॉन आरोनियन आणि विदित गुजराती यांच्यासारखे खेळाडू होते. हेक्सामाईंडच्या अनीश गिरीने पी. हरिकृष्णाला लढतीतील चुरशीच्या अखेरच्या टप्प्यात हरवून निकाल निश्चित केला.
पाचव्या स्थानासाठीच्या लढतीत ‘एमजीडी1’ने फ्रीडमचा दोन्ही सामन्यांमध्ये 4-2 असा पराभव केला. माजी विश्वविजेते आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणात नंतर सांगितले की, वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप हा जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्याच्या जागतिक संस्थेच्या दृष्टिकोनाचा एक मुख्य भाग आहे. आनंदने फ्रीडम संघाचे प्रतिनिधीत्व करत स्पर्धेत भाग घेतला होता.









