कोल्हापूर :
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी राधानगरी धरणाला भेट देत धरणाचे पाणलोट क्षेत्र व स्वयंचलित दरवाज्यांची पाहणी केली. यावेळी येथे रिडेल गेट बसवण्याचा प्रस्ताव महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये असून याबाबत त्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर 2019 ते 2024 पर्यंतच्या सरासरी पावसाच्या नोंदींची माहिती घेतली. तसेच करंजफेण–नरतवडे बोगदा, शिंगणापूर बंधारा येथील महापालिकेचे पाणी उपसा केंद्र, दसरा चौक येथील सुतारमळा आदी ठिकाणांनाही दिवसभरात भेटी देण्यात आल्या.
पंचगंगा–कृष्णा नदीच्या महापुराची व्याप्ती कमी करण्यासाठी महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रकल्पांतर्गत पूरनियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी तीन हजार दोनशे कोटींचा निधी लागणार असून त्यातील 2 हजार 338 कोटींचा निधी जागतिक बँक देणार आहे. गुरुवारी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. प्रतिनिधींचे दोन गट करण्यात आले होते. यामधील एक गट सांगलीला गेला. तर दुसऱ्या गटाने कोल्हापुरात पाहणी केली.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बँकेचे प्रतिनिधी युकीयो तानाका, रुमिता चौधरी, अभिजीत सहा, मित्रा संस्थेचे संचालक विनय कुलकर्णी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहीत बांदवडेकर असे पथक राधानगरी धरण येथे गेले. तेथे त्यांनी धरणाची पाहणी केली. येथील स्वयंचलित दरवाजे त्यांनी पाहिले. येथे ‘रिडल गेट‘ बसवण्याचा प्रस्ताव महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनात आहे. याचाही त्यांनी आढावा घेतला. अतिवृष्टी काळात अतिरिक्त पाणी भोगावती खोऱ्यातून, दूधगंगा खोऱ्यात सोडून पूरस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी करंजफेण– नरतवडे बोगद्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित योजनेनुसार साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा करंजफेण येथील भोगावती पात्रापासून, दूधगंगा नदीपर्यंत (नरतवडे) काढण्यात येणार आहे. याचीही माहिती जागतिक बँकेंच्या प्रतिनिधींनी घेतली व त्याची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी शिंगणापूर बंधाऱ्याला भेट देत येथील महापालिकेच्या उपसा केंद्राची पाहणी केली. महापूरकाळात हे उपसाकेंद्र पाण्याखाली जाते याबाबत माहिती घेतली. यानंतर प्रयाग येथे संगमाच्या ठिकाणीची पाहणी केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते सुतारवाड्याजवळ आले. या परिसरात किती फूट पाणी येते. त्यावेळी पंचगंगा नदीची पाणीपातळी किती फुटावर असते याबाबतची त्यांनी माहिती घेतली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जलअभियंता हर्षजीत घाटगे, अग्निशमन दलाचे मनिष रणभिसे उपस्थित होते.
- जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक
जागतिक बँक प्रतिनिधींच्या दोन टिम त्यांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शुक्रवार 24 रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेणार आहेत. येथे पाहणीतील मुद्दे व पूरस्थिती नियंत्रणाबाबत दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे.








