वृत्तसंस्था/ कोपनहेगन
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने एकेरीची तिसरी फेरी गाठली तर किदाम्बी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
लक्ष्य सेनने दुसरया फेरीच्या लढतीत कोरियाच्या जेऑन ह्योओक जिनवर 21-11, 21-12 अशी सरळ गेम्सनी मात केली. 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेत लक्ष्य सेनने कांस्यपदक पटकावले होते. लक्ष्यला येथे 11 वे मानांकन मिळाले असून तिसऱ्या फेरीत त्याची लढत थायलंडच्या कुनलावत वितिडसर्नविरुद्ध होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये झालेल्या आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनला जिनकडून हार पत्करावी लागली होती. त्याची परतफेड सेनने येथे केली. सेनने सावध व चपळ खेळ करीत रॅलीजमध्ये पुढाकार घेतला. कौशल्य, वेग व अचूक शॉट सिलेक्शनचे प्रदर्शन करीत त्याने लगेचच 5-1 अशी आघाडी घेतली आणि झगडणाऱ्या जिनविरुद्ध ही आघाडी वाढवत नेली. वेगवान रॅलीजमध्ये जिन कमी पडत असल्याचे दिसून आले. ब्रेकवेळी सेनने 11-6 अशी बढत मिळविली होती. ब्रेकनंतरही सेनने वर्चस्व कायम राखत 18-11 अशी आघाडी वाढवत नेली. नंतर सलग तीन गुण घेत हा गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सेनने 4-1 अशी झटपट आघाडी घेतली आणि नंतर ती एका शानदार फोरहँडमवर 10-5 अशी केली. आणखी एक उंच उडी घेत मारलेल्या श्मॅशवर गुण घेत ब्रेकवेळी 11-5 अशी बढत मिळविली. ब्रेकनंतरही सेनने वर्चस्व कायम राखत आठ मॅचपॉईंट्स मिळविले आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याने गेमसह सामना संपवला.
सोमवारी झालेल्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतला केन्टा निशिमोटोकडून हार पत्करावी लागल्याने पहिल्याच फेरीतून तो बाहेर पडला. निशिमोटोने त्याला 21-14, 21-14 असे हरवित दुसरी फेरी गाठली.









