कचरा समस्या दूर करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्याची संधी : बेळगाव मनपा पाठपुरावा करणार
बेळगाव : घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी देशातील 18 महापालिकांची निवड करण्यात येणार आहे. याची एकदिवशीय कार्यशाळा दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा दोनदिवशीय कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर देशातील 100 महापालिकांकडून आराखडा घेतल्यानंतर ज्या महापालिकेचा आराखडा सर्वोत्कृष्ट असेल अशा 18 महापालिकांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील पर्यावरण साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी दिली. शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी युरोपियन देशांकडूनही आर्थिक मदत केली जाणार आहे. ही मदत केली असली तरी ती परत द्यावी लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के रक्कम या प्रकल्पांसाठी देणार आहेत.
त्यामुळे निवड झाल्यानंतर केंद्र सरकारकडे त्याचा योग्य पाठपुरावा राज्य सरकारने करणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून 15 जानेवारीपर्यंत संपूर्ण आराखडा संबंधित विभागाला पाठविणे गरजेचे आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीदरम्यान निवड झालेल्या महापालिकांची नावे जाहीर केली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर 20 टक्के रक्कम महापालिकेच्या निधीतून द्यावी लागणार आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध प्रकल्पांसाठी 135 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा बेळगाव महापालिकेला होऊ शकतो. मात्र, त्यासाठी योग्य प्रकारे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. राज्य सरकारनेही प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी या निधीचा निश्चितच फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मनपा प्रयत्न करणार
जानेवारीमध्ये संपूर्ण अहवाल पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाला पुन्हा दिल्लीला जावे लागणार आहे. त्यामध्ये महापौरांचाही सहभाग राहणार आहे. या योजनेमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे आपला क्रमांक 18 च्या यादीत कसा बसेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनपा पर्यावरण साहाय्यकांनी सांगितले.









