तरुणांनी एमएसएमई योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारने तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने एमएसएमई योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील रहा, असा सल्ला कोल्हापुरातील जे. मेकॉट्रॉनिक्सचे संस्थापक, भागीदार मोनिश जिरगे यांनी दिला. भरतेश ग्लोबल बिझनेस स्कूल व एमएसएमई बेंगळूर टेक्नॉलॉजी सेंटरच्या सहकार्याने एमबीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी एमएसएमई प्रशिक्षण केंद्र, बेंगळूरचे प्रवीणकुमार एम. पी. व ग्रोथ मॅट्रिक्सच्या सीईओ संस्थापक पुनिता कोरवार यांनी डिजिटल सेवा आधारित स्टार्टअप व डिजिटल व्यवसायासाठी आज भरपूर संधी असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
भरतेश संस्थेचे सचिव विनोद दोड्डण्णावर म्हणाले, डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसाय सुरू करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांचा सामना करून कायमता वाढवत उद्योग सुरू व्हावेत. अध्यक्षस्थानी असलेले ग्लोबल बिझनेस स्कूलच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष शरद बाळीकाई यांनीही मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. संचालक डॉ. प्रसाद दड्डीकर यांनी स्वागत केले. मंदार यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्विनी यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी रंजना चौगुले, डॉ. निखिल रागशेट्टी, माणिकचंद बस्तवाड व डॉ. गुरुप्रसाद कोटी यांनी पुढाकार घेतला.









