आयटी तज्ञ स्वप्निल पाटणेकर यांचे मार्गदर्शन
बेळगाव : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडत आहेत. या तंत्रज्ञानामुळे जगभरातील माहिती अवघ्या काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होते. माध्यम क्षेत्रातही एआय टेक्नॉलॉजीमुळे अनेक बदल घडत आहेत. माहिती मिळविणे, व्याकरणदृष्ट्या योग्य माहिती जमा करणे, भाषांतरण करणे तसेच नवीन विषयावर लेखन करताना एआय टेक्नॉलॉजी पत्रकारांना महत्त्वाची आहे, असे विचार बेळगावमधील आयटी तज्ञ स्वप्निल पाटणेकर यांनी मांडले.
माहिती व प्रसिद्धी खात्याच्यावतीने बेळगावमधील पत्रकारांसाठी सोमवारी वार्ता भवन येथे एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वप्निल पाटणेकर यांनी चॅट जीपीटी, डिपसिक, ग्रामर्ली यासह इतर टूल्सचा वापर एखाद्या बातमीच्या लेखनासाठी कसा होऊ शकतो, याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.
एआयच्या वापरामुळे वृत्तपत्रीय भाषेत क्षणार्धात माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यांचे कोणत्याही भाषेत भाषांतर होऊ शकते. ही सर्व माहिती पत्रकारांना माहीत व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्वप्निल पाटणेकर हे ‘सायबर सिक्युरिटी अँड थ्रेट डिटेक्शन’ या विषयावर देशासह परदेशातील पोलीस व गुप्तचर खात्यांना प्रशिक्षण देतात. ज्येष्ठ पत्रकार ऋषिकेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. माहिती व प्रसिद्धी विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी स्वागत केले. पत्रकार रवींद्र उप्पार यांनी आभार मानले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जोशी, उपाध्यक्ष श्रीशैल मठद, संजय सूर्यवंशी यासह इतर उपस्थित होते.









