राष्ट्रीय संशोधकांचा सहभाग
बेळगाव : आयसीएमआर आणि एनआयटीएम यांच्यावतीने दोन दिवसांच्या ‘डिझायनिंग व कंडक्टिंग क्लिनिकल ट्रायल्स’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील 10 राज्यांतील संशोधक भाग घेणार असून 14 ते 15 सप्टेंबरदरम्यान ही कार्यशाळा आयसीएमआरच्या सभागृहात होणार आहे. आयसीएमआरचे संचालक आणि संशोधक डॉ. सुबर्णा रॉय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयसीएमआर व एनआयटीएम (राष्ट्रीय पारंपरिक चिकित्सा विज्ञान संस्था व स्वास्थ्य अनुसंधान विभाग) ही संस्था 1995 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला छोट्याशा इमारतीमध्ये संशोधन काम सुरू झाले. आता भव्य इमारत उभारली असून तिचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळा आयोजनाचा उद्देश
केंद्र सरकारच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. वेगवेगळ्या औषधांवर संशोधनासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश म्हणजे वैद्यकीय, दंत, फार्मसीमधील चिकित्सक आणि संशोधकांसह संपूर्ण आरोग्यप्रणालीमध्ये क्लिनिकल संशोधन क्षमता मजबूत करणे असल्याचे सांगितले. सध्या 14 संशोधक या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. दोन दिवसांची कार्यशाळा होणार आहे. त्याचे उद्घाटन चेन्नई येथील आयसीएमआरचे संचालक डॉ. पद्माप्रियदर्शिनी, चंद्रशेखरन आणि डॉ. शिवप्रसाद गौडर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएमआरच्या मुख्य डॉ. अपर्णा मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.
विविध संशोधनाबाबत मार्गदर्शनाचा समावेश
दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतून संशोधक उपस्थित राहणार आहेत. त्यांना अॅलोपॅथिक, होमिओपॅथिक, युनानी व आयुर्वेदिक पद्धतीवरील संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेमध्ये फार्मासिस्ट यांचाही समावेश राहणार आहे. प्रथम प्राण्यांवर व नंतर मनुष्यावर प्रयोग करूनच त्या औषधाला मान्यता दिली जाते, याबाबतची माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. यावेळी डॉ. मनीष बार्वलिया, डॉ. बानप्पा उनगेर आदी उपस्थित होते.









