रत्नागिरी :
प्रस्तावित वाटद एमआयडीसीला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे पुन्हा एकदा या परिसरातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी ठणकावले. जीव गेला तरी चालेल पण आम्ही शेवटपर्यंत लढू. हा लढा फक्त ग्रामस्थांसाठी आहे आणि जोपर्यंत वाटद एमआयडीसी रद्दची अधिसूचना जाहीर होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार दादर येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवात वाटद-खंडाळा पंचक्रोशी आणि संपूर्ण रत्नागिरी जिह्यात या प्रकल्पाविरोधात घरोघरी जाऊन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे चाकरमान्यांनी स्पष्ट केले. कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्य आणि पारंपरिक उपजीविका धोक्यात आणणाऱ्या प्रस्तावित ‘वाटद एमआयडीसी’ला रत्नागिरीतील स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर वाटद एमआयडीसीविरोधी संघर्ष कृती समितीने रविवारी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉलमध्ये जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक अॅड. असीम सरोदे यांनी व्हिडीओद्वारे जनसंवाद साधला तर वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समिती प्रमुख प्रथमेश गावणकर, शिवराज्य संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. रोशन पाटील, शिवराज्य संघटना महाराष्ट्र प्रमुख अतुल म्हात्रे, वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समिती प्रमुख सहदेव वीर, वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष प्रमुख संतोष बारगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला कोकणातील शेतकरी, निसर्गप्रेमी आणि वाटद पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत प्रथमेश गावणकर यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून नागरिकांच्या हक्कांसाठी आहे. गावणकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. 2019 मध्ये प्रस्तावित झालेला हा प्रकल्प 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता, मग 14 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा 32/2 ची नोटीस देऊन अवघ्या 9 दिवसात जमीन मोजणीची प्रक्रिया का सुरू झाली? विशेष म्हणजे नेमक्या कोणत्या उद्योगासाठी ही जमीन संपादित करायची आहे, याचा अधिसूचनेत उल्लेख नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या जागेविषयीही गावणकर यांनी या जनसंवाद सभेत संशय व्यक्त केला. रिलायन्सच्या अधिकृत माहितीनुसार, या प्रकल्पाला फक्त 300 एकर जागा लागणार आहे, मग सरकार 2255 एकर जागा का संपादित करत आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये नेते, प्रशासकीय अधिकारी व परप्रांतीय लोकांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. समितीने स्थानिक पातळीवर जनसुनावणी घेण्याची मागणी केली होती, मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. 9 दिवसांत कारवाई करणारे सरकार आमच्या मागणीला उत्तरे द्यायला 8 महिने लावते ही शोकांतिका आहे, असे गावणकर म्हणाले. यावेळी गावणकर यांनी मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासियांना गावातील सर्व बांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या सभेला दामोदर गोरीवले, देवधर बागडे, ओमकार शितप, अॅड. विकी कदम, अमोल भातडे, प्रणिता गावणकर यांसह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही आपापले विचार मांडत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. जोपर्यंत वाटद एमआयडीसी रद्द करण्याची अधिसूचना जाहीर होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा सरकारला दिला आहे.
- आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न: गावणकर
ग्रामस्थांच्या बाजूने सुरू असलेल्या या लढ्याला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रथमेश गावणकर यांनी केला. ते म्हणाले, आंदोलन सुरू झाल्यापासून माझ्याबद्दल बदनामी करणाऱ्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्राया बातम्या पसरवल्या जात आहेत. काही गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी धमकावल्याच्या घटनाही घडल्या. हे वास्तव भयावह असल्याचे गावणकर यांनी म्हटले आहे. जोपर्यंत वाटद एमआयडीसी रद्दची अधिसूचना जाहीर होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. चर्चा मुद्यांवर व्हायला पाहिजे, बंद खोलीत नको, असेही त्यांनी लोकप्रतिनिधी व सरकारला उद्देशून म्हटले आहे.








