31 रोजी विविध मागण्यांसाठी कामगार खात्याच्या कार्यालयावर मोर्चा
बेळगाव/
बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार खात्याकडून हजेरी पुस्तिका अथवा वेतन पावती देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या कामगार खात्याच्या तरतुदींचे पालन करणे कामगारांना शक्य नसल्याने कामगारांकडून सरकारच्या आदेशाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. सदर आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. याविरोधात दि. 31 रोजी दुपारी 4.00 वा. कामगार खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांनी केले आहे.
असंघटित क्षेत्रात असणाऱ्या कामगारांसाठी सरकारकडून अनेक योजनांचा लाभ करून दिला जात आहे. बांधकाम क्षेत्रात असणाऱ्या कामगारांना सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येत आहे. विवाहासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, विमा सुरक्षा, बांधकाम कामासाठी लागणारे किट आदी सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकजण खोटी माहिती देऊन या योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळेनासा झाला आहे. सरकारच्या योजनांचा खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी कामगार खात्याकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.
गैरकारभार टाळण्यासाठी बांधकाम खात्याकडून कामगारांना अट घालण्यात आली आहे. कामगारकार्ड नूतनीकरण असताना हजेरी पुस्तिका अथवा काम करत असणाऱ्या मालकांकडून वेतन स्लिप देण्याची सक्ती करण्यात आली आहे. सदर अट कामगारांसाठी जाचक ठरत आहे. बहुतांश कामगार कंत्राटदाराकडे काम करतात, ते एकाच ठिकाणी अधिककाळ कामावर नसतात. त्यामुळे वेतन स्लिप अथवा हजेरी पुस्तिका ठेवणे अशक्य आहे. सरकारने ही अट रद्द करावी, अशी मागणी बांधकाम कामगारांकडून करण्यात येत आहे. याबरोबरच बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये व मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षांपासून जमा करण्यात आलेली नाही. या मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात येत आहे.
कामगार खात्याकडून घातलेली अट जाचक
-अॅड. एन. आर. लातूर (कामगार नेते)
कार्ड नूतनीकरण करून घेण्यासाठी बांधकाम कामगारांना कामगार खात्याकडून घातलेली अट जाचक आहे. सदर अट रद्द करण्यात यावी, बहुतांश कामगार एकाच ठिकाणी कामावर राहत नाहीत. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या कंत्राटदारांकडे काम करत असतात. त्यामुळे कामगार खात्याच्या नियमानुसार हजेरी पुस्तिका व वेतन स्लिप देणे अशक्य आहे.









