महापालिकेत मराठीची मागणी केल्याने थयथयाट
बेळगाव : महापालिकेत होत असलेल्या कानडीकरणाला विरोध करण्यासह सर्वसाधारण सभेची नोटीस मराठी भाषेतून देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत प्रवेशद्वारावर धिंगाणा घातला. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. महापालिकेत सर्वत्र कानडीकरण करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारने सूचना केली आहे. तेव्हापासून कन्नड संघटनेच्यावतीने महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. यापूर्वी महापालिकेत त्रिभाषा सूत्र अंमलात आणण्यात आले होते. कन्नडबरोबरच इंग्रजी व मराठी भाषेतून फलक लावण्यात आले होते. मात्र आता इंग्रजी व मराठी भाषेतील फलकांवर पांढरा कागद चिकटविण्यात आला आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजी व मराठी भाषेतून देण्यात येत होती. पण अलीकडेच कन्नडचा वरवंटा अधिकच तीव्र करण्यात आला असल्याने याबाबत सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.
महापालिकेवर निवडून गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गुरुवारच्या सर्वसाधारण बैठकीत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी कानडीकरणाला विरोध करत मराठी भाषेतून नोटीस देण्यात यावी, अशी जोरदार मागणी सभागृहाकडे केली. त्यामुळे उपस्थित सत्ताधारी व सरकारनियुक्त सदस्यांनी समितीच्या नगरसेवकांच्या मागणीला तीव्र विरोध केला. सभागृहात मराठीची मागणी करण्यात आल्याची माहिती समजताच कन्नड संघटनेच्या काही म्होरक्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. म. ए. समितीच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अन्यथा महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशी हास्यास्पद मागणी यावेळी करण्यात आली. काहीवेळ गोंधळ घातल्यानंतर कन्नड संघटनेचे टोळके निघून गेले. मात्र एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महापालिका आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









